मुंबई : रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकासात सल्लागार नियुक्त केल्यानंतर प्रकल्पाने आणखी वेग घेतला आहे. पात्रता निश्चितीचे परिशिष्ट २ यापूर्वीच प्रसिद्ध झाले असून आता दोन पुरवणी परिशिष्टे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहेत. यात आणखी ९०३ झोपडीधारक पात्र ठरले आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पूर्व द्रुतगती महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यात घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकरनगर येथील १ हजार ६९४ झोपड्या बाधित होत आहेत. त्यापैकी १ हजार २९ झोपडीधारक पुनर्विकासासाठी पात्र ठरले आहेत; उर्वरित अनिर्णीत झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
बाधित झोपड्यांच्या भोवतालच्या परिसराचाही पुनर्विकास केला जाणार आहे. यात एकूण १२ हजार ७६० झोपड्या आहेत. यातील ६ हजार ४७५ झोपडीधारक पहिल्या फेरीत पात्र ठरले होते. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरवणी परिशिष्ट १ मध्ये २४७ झोपडीधारक पात्र ठरले. तसेच पुरवणी परिशिष्ट २ मध्ये ६५६ झोपडीधारक पात्र ठरले. अशाप्रकारे ९०३ जण नव्याने पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता पात्रतधारकांची संख्या ७ हजार ३७८ वर गेली आहे. तसेच द्रुतगती मार्गातील पात्रता झोपड्यांची संख्या लक्षात घेता संपूर्ण रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकासात आता ८ हजार ४०७ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी संदीप शिर्के अॅण्ड असोसिएट्स या कंपनीची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३०६ कोटी रुपयांना हे कंत्राट देण्यात आले आहे. आंबेडकर नगर हा ३३.१५ हेक्टरचा परिसर आहे. नव्याने नेमण्यात आलेल्या सल्लागारातर्फे प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार केला जाईल. तसेच कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा तयार केल्या जातील.