

मुंबई : दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुन्हा हजेरी लावून मुसळधार कोसळला. यामुळे मुंबईसह पश्चिम व पूर्व उपनगरांतील सखल भाग जलमय झाला होता. शनिवारी सकाळी ७ वाजता सुरू झालेला पाऊस अधूनमधून थांबून बरसत होता, दुपारी २ वाजेच्या सुमारास पुन्हा कोसळल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली होती.
शनिवारी २४ तासांत पूर्व उपनगरांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात ३०.१६ मिमी, पश्चिम उपनगरे २१.८३ मिमी आणि मुंबई शहर ११.७५ मिमी पाऊस कोसळला. या पावसामुळे रेल्वेसेवा व बेस्ट आणि खासगी सेवांवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
सर्व वाहतूक सेवा सुरळीत सुरू होत्या दुपारच्या वेळी पडलेल्या पावसामुळे कुर्ला, भांडुप, गोवंडी, वडाळा, नेहरू नगर, वांद्रे, सांताक्रूझ, वर्सोवा, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या सखल भागात पाणी साचलेले होते. यामुळे शाळेतून सुटलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाताना तारेवरची कसरत करावी लागली. शनिवारी सकाळी, दुपार आणि रात्री या तीन सत्रांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले.
शनिवारच्या पावसामध्ये झाड्यांच्या फांद्या पडण्याच्या ४ घटना घडल्या. यामध्ये शहरात १, पूर्व उपनगरे २ आणि पश्चिम उपनगरे १ अशा एकूण ४ ठिकाणी फांद्या पडण्याच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे आल्या. या घटनांमध्ये कुठलीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. तसेच ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनाही घडल्या. यात शहरात ५, पूर्व उपनगरे १ आणि पश्चिम उपनगरे ३ आदींचा समावेश आहे. मात्र याही घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. मुंबई शहरात एका ठिकाणी भिंत कोसळण्याची घटना समोर आली. या घटनेतही कुणालाही इजा झालेली नाही.