टीईटी पेपरफुटी प्रकरण : ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेली परीक्षा संशयाच्या फेर्‍यात | पुढारी

टीईटी पेपरफुटी प्रकरण : ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेली परीक्षा संशयाच्या फेर्‍यात

पुणे, पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही विनर सॉफ्टवेअरने घेतली होती. त्या विनर सॉफ्टवेअरचा सर्वेसर्वा सौरभ महेश त्रिपाठी (वय ३९, सध्या रा. बेलमोरक इस्टेट, बाणेर, मूळ रा. ली रेसीडेन्सी गाझीयाबाद) याला पुणे पोलिसांनी लखनौ येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेली टीईटी परीक्षाही आता संशयाच्या फेर्‍यात आली आहे. (टीईटी पेपरफुटी प्रकरण)

२०१८ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार १५ जुलै २०१८ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल १२ ऑक्टोबर २०१८ मध्ये लागला. ही सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी जी. ए सॉफ्टवेअरकडे होती. अश्विनकुमार महाराष्ट्रासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर परीक्षेचे आयोजन व निकाल संकेत स्थळावर प्रसिध्द करण्याची जबाबदारी होती.

त्याचाच फायदा घेऊन जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विन कुमार याने नेमणूक असलेल्या तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे (६ ऑगस्ट २०१६ ते दि. ३१ ऑगस्ट २०१८), तुकाराम सुपे, प्रितीश देशमुख, अभिषेक सावरीकर संतोष हरकळ, अंकुश हरकळ, सुखदेव डेरे यांनी संगणमत करून गैर व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या तपासात सौरभ त्रिपाठीचे  नाव समोर आले. दरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेली टीईटी परीक्षा ही सौरव त्रिपाठीच्याच विनर सॉफ्टवेअरने घेतल्याने ही देखील टीईटी आता संशयाच्या भोवर्‍यात आली आहे. (टीईटी पेपरफुटी प्रकरण)

Criticism of BJP : भाजपचे हिंदुत्व एक प्रकारचा ‘चोरबाजार’च : शिवसेना

त्रिपाठीला अटक झाल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या तपासात त्याने अपात्र ठरलेल्या ५५० ते ६०० विद्यार्थ्यांची यादी इतर साथीदारांच्या मदतीने तयार केली असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडीची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी त्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 त्रिपाठीला पोलीस कोठडी

अटक आरोपी व इतर आरोपीमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणावर देवाण घेवाण झाली आहे. त्रिपाठी व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून खोटे निकाल लावल्याची कागदपत्रे जप्त करायची आहेत. अपात्र परिक्षार्थींना पात्र करण्यासाठीची तयार केलेली यादी जप्त करून त्यांच्याकडे तपास करायचा आहे. गैरप्रकारात पैशाची देवाण घेवाण कशी झाली. गैरव्यवहारातील पैसेही हस्तगत करण्यासाठी तसेच पैशाची विल्हेवाट कशाप्रकारे लावली याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने त्रिपाठीला पोलिस कोठडी दिली आहे.

पाहा व्हिडीओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद

Back to top button