महायुती सरकारविरोधात शुक्रवारी काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन

Congress
Congress
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महायुतीचे सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे, असा आरोप काँग्रेसने महायुतीवर केला आहे. महायुती सरकारविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून 'चिखल फेको' आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही. कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे, असा आरोप काँग्रेसने महायुतीवर केला आहे.

तसेच नीट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती-धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असाही गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने महायुतीच्या सरकारवर केला आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारविरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सेल व विभाग यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन महायुती विरोधात निषेध व्यक्त करणार आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news