कोल्हापूर : डी. बी. चव्हाण : Shahu Market Yard : जाडजूड पत्रा, सर्वत्र भले मोठे लोखंडी साहित्य अशी रचना असलेला मालवाहू रेल्वेची बोगी उलटू शकते, हे कोणालाही लवकर पटू शकत नाही. सादिकने आतून दरवाजापर्यंत आणून दिलेले सिमेंटचे पोते पाठीला लावले, ते घेऊन चार पावले पुढे गेलो अन् मागे धाडकन आवाज आला! राजर्षी शाहू मार्केट यार्ड रेल्वे गुडस्मध्ये सोमवारी घडलेल्या घटनेचा थरारक अनुभव कामगारांनी सांगितला.
ही बोगी उलटी होण्याचा थरारक प्रसंग सांगताना बोगीतील सिमेंटची पोती प्रत्यक्ष पाठीला लावून थप्पीला घेऊन जाणारा कामगार मन्नुदिन चमणशेख म्हणाला, रविवारी रात्री ही मालगाडी आली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी नऊ वाजता आम्ही कामावर आलो.
बोगीतून दरवाजापर्यंत पोते आणून देण्यासाठी सहाजण होते. चौघेजण पोती थप्पीला लावणार होतो. अकरा वाजेपर्यंत यातील नऊशे ते साडेनऊशे पोती उतरली होती. बोगीतील तीनशे ते चारशे पोती शिल्लक होती. उर्वरित पोती उतरून जेवणासाठी जाणार होतो.
सादिक शेख हा आतून दरवाजापर्यंत पोते आणून देत होता, हे पोते आपण पाठीला लावून थप्पीला लावत होतो. साधारणपणे अकराच्या सुमारास एक पोते पाठीला लावले, चार पावले पुढे घेऊन गेलो. तेवढ्यात मागे धाडकन आवाज आला आणि सिमेंटची मोठी धूळ उडाली. क्षणार्धात बोगीचा तळाचा भाग दिसू लागला. काहीक्षण काय झाले हेच कळेना, तेवढ्यात अन्य कामगार आले. त्यांनी बोगीच्या तळात असलेल्या लोखंडी पाईपांना धरून ते बोगीत उतरले.
या सहा कामगारांच्या अंगावर पोती पडलेली होती. त्यांनी ती बाजूला केली आणि उचलून बोगीच्या बाहेर आणले. इतर कामगारांनी त्यांना खाली घेतले; पण राजू गेंड याला बोगीतून वर काढता येत नव्हते. कारण, तो जखमी झाला होता. त्यात त्याचे वजन जास्त असल्यामुळे आतील कामगारांना बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढले.
सिमेंट पोत्यांनी भरलेल्या मालवाहू रेल्वेच्या सात बोगी सोमवारी मध्यरात्री मार्केट यार्डमधील रेल्वे गुडस्च्या क्रमांक तीनच्या धक्क्यावर दाखल झाल्या. ठेकेदार राजू हुंडेकर याच्याकडील सुरेश सांदुगडे, सिराज आदालखानसह 10 माथाडी कामगार बोगीतील सिमेंटची 1 हजार 397 पोती उतरून घेत होते. 900 सिमेंटची पोती उतरल्यानंतर अचानक बोगीच्या चाकाजवळील असणारे लॉक तुटले. क्षणार्धात 50 ते 60 टन वजन क्षमतेची बोगी उजव्या बाजूला कलंडली. धुराचे लोट येऊ लागले.