निवडणूक विशेष : सट्टा बाजारात मोदी, भाजपला कौल

निवडणूक विशेष : सट्टा बाजारात मोदी, भाजपला कौल

[author title="ताजेश काळे" image="http://"][/author]

देशात लागोपाठ तीन दिवस सर्वाधिक 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने चर्चेत आलेले राजस्थानातील फलोदी शहर सट्टा बाजारातील अचूक अंदाजासाठी भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशियात प्रसिद्ध आहे. मिठाचे शहर म्हणूनही फलोदीची ओळख आहे. याच फलोदीच्या सट्टाबाजारात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर लाखो, करोडो रुपयांचा सट्टा लागला आहे. या सट्टाबाजाराने केंद्रात पुन्हा बहुमताने भाजप व एनडीए आघाडीचे सरकार येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान होतील, यावर सर्वात कमी 1 ला 3 असा भाव लागलेला आहे. भाजपला अब की बार 400 पार नाही, पण 360 ते 365 जागा मिळतील, असा अंदाजही फलोदी सट्टाबाजाराने व्यक्त केला आहे.

सुमारे 500 वर्षांची परंपरा लाभलेला फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज तंतोतंत जुळतो, असा आजवरचा इतिहास आहे. कमी भाव म्हणजे, विजयाची खात्री आणि जास्त फायदा असे सट्टाबाजाराचे गणित आहे. स्वातंत्र्याच्या आधी कितीतरी वर्षांपासून फलोदीत सट्टा लावण्याची परंपरा सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कापूस, पीक, पाणी पावसाचा अंदाज, दोन वळूंची झुंज यावर सट्टा लागत होता. काळानुरूप बदल होऊन आता क्रिकेट सामने आणि निवडणुकांवर सट्टा लावला जात आहे. सट्टा बाजारातील ही उलाढाल करोडोंच्या घरात गेली आहे. मुंबईतील सराफा बाजार, जव्हेरी बाजार, अरांडा बाजार आणि शेअर मार्केट हे फलोदी सट्टाबाजाराचे मूळ उगमस्थान आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. पारंपरिक सट्टा बाजाराने आता ऑनलाईन स्वरूप धारण केले आहे.

भाजप 332, तर एनडीए 365 जागा जिंकण्याचा अंदाज

सहाव्या टप्प्याच्या मतदानानंतर भाजप 329 ते 332 जागा जिंकणार व एनडीए आघाडीला 360 ते 365 जागा मिळतील, असा अंदाज फलोदी सट्टाबाजाराने वर्तविला आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीला 140 ते 160 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. भाजप बहुमताने सरकार स्थापन करणार असून, नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा दावाही फलोदीच्या सट्टेबाजांनी केला आहे. पंतप्रधान पदासाठी मोदी यांच्यावर 1 ला 3 अर्थात 100 रुपयांना 300 रुपये या पटीने भाव लागलेला आहे.

फलोदी सट्टा बाजाराने सुरुवातीला भाजप 315 ते 325 जागा जिंकेल, असा अंदाज लावला होता. मात्र, पहिल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपच्या जागा कमी होऊन 295 ते 305 दाखविण्यात आल्या होत्या. आता भाजपला जास्त जागा मिळण्यावरून सट्टा बाजारात पुन्हा तेजी आली आहे. उत्तर प्रदेशात एकूण 80 जागांपैकी भाजप 62 ते 68 जागा जिंकण्याचा, तर काँग्रेस – सप आघाडीला केवळ पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानात 25 पैकी 23 जागा, मध्य प्रदेशात 27 ते 28, छत्तीसगडमध्ये 9 ते 10, कर्नाटकात 18 ते 20 तर पश्चिम बंगालमध्ये 20 ते 22 जागा भाजप जिंकण्याचा अंदाज आहे. आसाम, ओडिशा, झारखंडमध्ये प्रत्येकी 11 ते 12 जागा, आंध्र प्रदेश 9 ते 11, तेलंगणा 6 ते 7, राजधानी दिल्लीच्या सर्व 7, हिमाचल प्रदेशातील 4 जागा भाजपला मिळणार असल्याचा अंदाज या सट्टाबाजाराने लावला आहे.

इंदूर, रतलाम बाजारातही मोदींचाच बोलबाला !

मध्य प्रदेशातील इंदूर व रतलामच्या सट्टा बाजारात भाजप व एनडीए आघाडीच्या विजयावर करोडोंचा सट्टा लागला आहे. इंदूरच्या सट्टा बाजारात भाजपला 370 ते 375, तर एनडीए आघाडीला 407 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान बनतील, यावर सट्टाबाजार जोरात आहे. उत्तर प्रदेशात भाजप 74, महाराष्ट्रात 39, पश्चिम बंगाल 24, बिहार 36, मध्य प्रदेश 29, गुजरात 26, कर्नाटक 25, तर राजस्थानात 23 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश 19, ओडिशा 14, झारखंड 13, आसाम 10, हरियाणा 10, तेलंगणा 7, दिल्ली 7, उत्तराखंड 5, हिमाचल प्रदेश 4, जम्मू काश्मीरमधील 4 जागाही भाजपला मिळणार असल्याचे भाकीत आहे. त्यावर सट्टा बाजारात उधाण आले आहे.

राज्यात महायुतीला 28 तर मविआला 20 जागा?

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 'काँटे की टक्कर' असल्याचे फलोदी सट्टा बाजारातील अंदाजावरून दिसून आले आहे. राज्यातील एकूण 48 जागांपैकी भाजपच्या महायुतीला 28 जागा, तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चुरशीची लढत असलेल्या जागांवर मोठ्याप्र माणात सट्टा लागलेला आहे. कोण किती लाखांच्या फरकाने विजयी होईल, या अंदाजावर सट्टा बाजारात भाव फुटला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news