नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात, अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची त्यात अडचण असल्यामुळे त्यांनी दोन्ही पक्ष फोडले. त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान बघितला नाही. खोट बोलण्याच्या त्यांच्या जागतिक विक्रमाची नोंद लवकरच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल, अशी टीकाही खा. राऊत यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक येथे आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी २०१९ मध्ये शरद पवारांनी सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले आहे. यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, हे अजून किती वेळा बोलणार, गुळगुळीत झाले आहे आता. आता दुसरे काहीतरी बोला. धमकी वगैरे द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.
मोदी, शाह यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, मोदींना माझा सवाल आहे, तुम्ही आमचे बारा लोक घेतले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. मोदी यांची भ्रष्टाचार विरोधाची पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचारविरोधी लढाई करत आहेत, असे नमूद करता मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी, असे आव्हानही राऊत यांनी दिले. अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आम्ही ओबीसी आरक्षण रद्द करू असे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने याची नोंद घेतली आहे, इतकेच मी सांगतो असे ते यावेळी म्हणाले.
नसीम खान यांना विरोध नाही
उत्तर मध्य मुंबईत मुस्लीम उमेदवाराला शिवसेनेचा विरोध होता, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. यावर राऊत म्हणाले की, मुस्लीम उमेदवार दिल्यास ती जागा कठीण जाईल, असे आम्हाला वाटत होते. परंतु आमचा विरोध नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. वर्षा गायकवाड की नसीम खान यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची, ते काँग्रेसने ठरवावे. अजूनही उमेदवार बदलता येऊ शकतो, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये समोर गद्दारच हवा!
राजाभाऊ समोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. त्यांना आम्ही गाडणारच, असे सांगत खा. राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली. राजाभाऊ वाजे यांना संजय राऊतांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला.
—