आणखी एक प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला, विरोधकांनी सरकारला घेरले | पुढारी

आणखी एक प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला, विरोधकांनी सरकारला घेरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्पही महाराष्ट्र सोडून गेल्याचे वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया हा प्रकल्प उभारणार होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून इथेन क्रॅकिंग युनिट उभारले जाणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे.

मध्य प्रदेशमधील सिहोर का निवडले?

  • गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (गेल) ही कंपनी सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथे प्रकल्प उभारणार आहे.
  • प्रकल्पाचे काम सुरू करतानाच १० हजार पेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत.
  • देशाच्या मध्यभागी हे ठिकाण असल्याने कनेक्टिव्हिटी अधिक आहे.
  • कंपनी अशी जागा शोधत होती, जिथे कोणताही कायदेशीर विवाद नसावा तसेच अतिक्रमण आणि धार्मिक स्थळ नसावे.
  • कंपनीने येथे ८०० हेक्टर जमीन फायनल केली आहे.

ही माहिती मिळताच विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील गुंतवणूक पळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचे पाप भाजप करत आहे, अशी टीका दानवे यांनी केली. केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेली गुंतवणूक परराज्यात जात असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी दानवे यांनी केली.

महाराष्ट्राबाहेर गेलेले महत्त्वाचे प्रकल्प

  • टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला.
  • वेदांता फॉक्सकॉनचा पुण्यात होणारा तब्बल १. ६३ लाख कोटींचा प्रकल्प देखील गुजरातला गेला.
  • रायगडमध्ये होऊ घातलेला १९ कोटी रुपयांचा बल्कड्रग्ज प्रकल्प हिमाचलला नेण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button