

मुंबई : पुढारी ऑनलाईन
मिशन २०२४ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्रात भाजपविरोधात तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी नुकताच मुंबई दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी चर्चेपासून दूर ठेवले. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. भाजपविरोधी लढाईत ममता बॅनर्जी महत्त्वपूर्ण योद्धा आहेत. पण काँग्रेसला सोबत घेऊन काम केले तर चांगली आघाडी (फ्रंट) तयार होईल. काँग्रेसला दूर ठेवून आघाडी योग्य होणार नाही, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी केले आहे.
यूपीए कुठे? हा ममतांचा सवाल योग्य आहे. ममतांच्या मनात गृह आहे की काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणं आहे की यूपीएला मजबूत केले नाही तर २०२४ (मिशन २०२४) मध्ये कसं लढणार. त्यासाठी काँग्रेसला सोबत घेऊन पुढे जावे लागेल. यूपीएच्या प्रमुख सोनिय गांधी यांच्या नेतृत्त्वावर कोणताही सवाल नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपविरोधात पर्याय बनेल पण नेता कोण याचा निर्णय नंतर घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. त्यांना भारतरत्नने का सन्मानित केले जात नाही. वीर सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत, असे सांगत संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली होती.
बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत, देशाचे भावी नेतृत्व कोण करेल, कोणकोणत्या पक्षांची एकी होईल, याविषयी काही संकेत दिले. ममतांसोबतच्या भेटीत काय झाले, असा थेट प्रश्न केला असता, सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीकरिता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूने बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली, असे पवार म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही, त्यामुळे तुमच्या आघाडीमधून काँग्रेसला वगळणार का, यावर उत्तर देताना पवार यांनी, काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे बोलून त्यांनी प्रश्नाला बगल दिली होती.