Anandrao Adsul : अडसूळांना हायकोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला  - पुढारी

Anandrao Adsul : अडसूळांना हायकोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला 

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे

माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी बॅंकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बॅंकेत सुमारे ९०० कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, ईडीचा कारवाई विरोधात अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेची उच्च न्यायालयाचे  न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने दाखल घेत याचिका फेटाळून लावली. मात्र थोडासा दिलासा देत सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अडसूळ यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता.

हा ही अर्ज  न्यायाधीश ए. एस. सतभाई यांनी फेटाळून लावताना आनंदराव अडसूळ यांच्या विरोधातील  प्रथमदर्शनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे निरीक्षण नोंदविले होते. असेच अर्जदाराला दिलासा दिल्यास चालू तपासावर त्याचा गंभीर परिणाम शकतो. गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यातील गुंतागुत लक्षात घेता ईडीला तपासात पुरेसे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे, असेही आदेशात स्पष्ट केले होते.

या निर्णयाविरोधात अडसूळ (Anandrao Adsul) यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या समोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी अर्जाला जोरदार आक्षेप घेतला. अडसूळ यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. थकीत कर्जदारापैकी सुमारे 56 जवळच्या नातेवाईकाना कर्ज मजूर केले आहे. या सर्वांचा तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्ज फेटाळावा अशी विनंती केली.

Back to top button