Mumbai North West Lok Sabha seat | ब्रेकिंग! मुंबई उत्तर पश्चिममधून शिंदेंच्या सेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी | पुढारी

Mumbai North West Lok Sabha seat | ब्रेकिंग! मुंबई उत्तर पश्चिममधून शिंदेंच्या सेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायरकर अशी लढत रंगणार आहे. (Mumbai North West Lok Sabha seat)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याआधीच उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाने माजी मंत्री रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वायकर यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. तर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहाणे पसंत केले. या निष्ठेची पोचपावती म्हणून अमोल कीर्तिकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरुद्ध आता शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उभे केले आहे.

या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातून अभिनेता गोविंदा, मराठी अभिनेते सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर तसेच माजी खासदार संजय निरुपम आदींची नावे चर्चेत होती. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. आता रवींद्र वायकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. वायकर यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

या मतदारसंघात वायकर यांचे असलेले प्राबल्य पाहता त्यांना उमेदवारी देऊन महायुतीने तुल्यबळ लढत उभी केली आहे. वायकर यांनी १९९२ ते २०१२ असे सलग चार वेळा जोगेश्वरी पूर्वेचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. या कार्यकाळात त्यांनी चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. तर २००९ पासून सलग तीनवेळा ते जोगेश्वरीचे आमदार राहिले आहेत. त्यांनी फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. (Mumbai North West Lok Sabha seat)

हे ही वाचा :

Back to top button