अकरा कोटींच्या कोकेनसह विदेशी नागरिकाला अटक; पोटातून कॅप्सूलद्वारे आणलं 1108 ग्रॅम कोकेन | पुढारी

अकरा कोटींच्या कोकेनसह विदेशी नागरिकाला अटक; पोटातून कॅप्सूलद्वारे आणलं 1108 ग्रॅम कोकेन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सुमारे 11 कोटीच्या कोकेनसह एका विदेशी नागरिकाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्‍यानी अटक केली. या नागरिकाने पोटातून कॅप्सूलद्वारे 1108 ग्रॅम वजनाचे कोकेन आणल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

संबंधित बातम्या 

विदेशातून कोट्यवधी रुपयांची ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त होताच डीआरआयच्या अधिकार्‍यानी प्रत्येक प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. गुरुवारी 28 मार्चला आरोपी प्रवाशी सिएरा लिओन येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याने पेाटातून कोकेन आणल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला स्थानिक न्यायालयात हजर करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची परवानगी घेण्यात आली होती.

न्यायालयाकडून परवानगी मिळताच त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे केलेल्या एक्सरे तपासणीदरम्यान त्याने कॅप्सूलद्वारे ते कोकेन आणल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या पोटातून कॅप्सूल काढून 1108 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे 11 कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीप्रकरणी नंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन या अधिकार्‍यानी त्याला अटक केली. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात त्याला काही रक्कमेचे कमिशन मिळणार होते. मात्र कोकेनची डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला या अधिकार्‍यानी अटक केली.

Back to top button