Lok Sabha Elections 2024 : महायुती जागावाटपावर मुंबईत पुन्हा खलबते; शिंदेंची अडचण मोठी | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : महायुती जागावाटपावर मुंबईत पुन्हा खलबते; शिंदेंची अडचण मोठी

मुंबई/नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसला 5 आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला 8 ते 9 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाजप श्रेष्ठींनी या दोन्ही गटांना निक्षून सांगितल्याने महायुतीमधील जागावाटपावर मुंबईत पुन्हा चर्चा होणार आहे. तिन्ही पक्षांनी मुंबईत जाऊन पुन्हा चर्चा करावी आणि मग पुन्हा दिल्लीत बसून निर्णय घेऊ, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीअखेर सांगितले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने लढविलेल्या 2019 च्या लोकसभेच्या जागांखालोखाल 12 जागांची मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यानंतर ही मागणी 9 जागांवर आणली, तरी भाजपने ती मान्य केलेली नाही. अजित पवार गटाला 5 पेक्षा जास्त जागा सुटणार नाहीत, असे चित्र आहे. राष्ट्रवादीने 2019 मध्ये माढा, मावळ, बारामती, रायगड, शिरूर, सातारा, बुलडाणा, रावेर, जळगाव, नाशिक, मुंबई, परभणी, बीड, गोंदिया-भंडारा, हातकणंगले इत्यादी ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यानुसार भाजपकडून आपल्याला हे मतदारसंघ सोडले जातील, ही अजित पवार यांची आशा फोल ठरली आहे.

देशातील 195 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार घोषित केल्यानंतर भाजप महाराष्ट्रातील जागावाटप करेल, असे शिंदे आणि पवार यांना वाटले होते; पण राज्यातील नेत्यांवर विश्वासघाताचे खापर फुटू नये, याची खबरदारी घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जागावाटपाची सूत्रे आपल्याकडे घेतली. मुंबई भेटीवर आलेले शहा किरकोळ चर्चा करून दिल्लीला रवाना झाले. मात्र, दिल्लीतही शिंदे आणि अजित पवार यांना एक अंकी जागा देऊ करून शहा यांनी धक्काच दिला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी अमित शहा यांच्याशी शुक्रवारी रात्री तब्बल अडीच तास खलबते केली. अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहा यांची शुक्रवारी रात्री उशिरा स्वतंत्र भेट घेतली. मात्र, 5 पेक्षा अधिक जागा सोडण्यात येणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचे कळते.

शिंदेंची अडचण मोठी

उद्धव ठाकरेंविरोधात बंड केल्यानंतर तब्बल 13 खासदार शिंदे गटात दाखल झाले. त्यातील किमान चौघांना उमेदवारी नाकारावी लागेल किंवा भाजपने स्वीकारलेच, तर या चौघांना कमळ चिन्हावर उभे करावे लागेल. फक्त 9 जागा मिळत असल्याने विद्यमान खासदार संख्या जास्त असलेल्या एकनाथ शिंदे यांची अडचण अजित पवारांपेक्षा अधिक आहे. मुंबईत परतल्यानंतर ते यातून काय मार्ग काढतात आणि आपल्या खासदारांची तसेच इच्छुक उमेदवारांची समजूत कशी काढतात, यात त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

शहांची ठाम भूमिका

उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे का, हे तपासा, अशी ठाम भूमिका शहा यांनी घेतली. जागावाटप, अदलाबदली, उमेदवार, यावर तिन्ही पक्षांनी राज्यातच चर्चा करावी. कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडे उमेदवार कोण आहे, याची सविस्तर चर्चा करून पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा करून अंतिम निर्णय करूया, असे अमित शहा यांनी शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना सांगितल्याचे समजते.

आज किंवा उद्या बैठक

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या केेंद्रीय निवडणूक समितीची बैठक 10 किंवा 11 मार्चला होण्याची शक्यता आहे. या जोडीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची बैठक शहांसोबत होईल आणि भाजपच्याच धोरणानुसार जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाईल. तसे झाले तर भाजपच्या दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे असू शकतात.

Back to top button