पंतप्रधान नरेंद्र मोदी : विमाने सुरू करण्याचा फेरविचार करा | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : विमाने सुरू करण्याचा फेरविचार करा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : बत्तीस अवतार धारण करणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ दाखल झाल्याने जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण असून, 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील देशांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. नंतर पश्‍चात्ताप करण्यापेक्षा आताच आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत करण्याचा फेरविचार करावा, असा मुद्दा त्यांनी मांडला. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

मोदी यांचे 6 सल्ले

1 नव्या व्हेरियंटच्या मुकाबल्यासाठी आतापासूनच तयारी हवी.
2 ज्या भागांत अधिक रुग्णसंख्या, तेथे देखरेख व कंटेन्मेंट झोनसारखे धोरण सुरू ठेवावे.
3 लोकांनी सतर्क व्हावे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
4 आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध हटवून सवलती देण्याच्या योजनेवर जगाने पुनर्विचार करावा.
5 लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या वाढवावी.
6 पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोसही वेळेत द्यावा, ही जबाबदारी राज्य सरकारांनी घ्यावी.

वेगवान अन् धोकादायक ओमिक्रॉन

लंडन : वृत्तसंस्था : कोरोना व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ अत्यंत गतिमान आणि धोकादायक असून, अवघ्या चार दिवसांत तो आठ देशांमध्ये धडकला आहे. आजवर डेल्टा हा सर्वाधिक वेगवान संक्रमण असलेला व्हेरियंट होता. डेल्टामुळेच जगात कोरोनाची तिसरी लाट आली.

आता ‘ओमिक्रॉन’मुळे नव्या लाटेचा धोका उद्भवला आहे. डेल्टाच्या तुलनेत तो सातपटीने वाढतो आहे. बोत्सवानात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. नंतर दक्षिण आफ्रिका, इस्रायल, हाँगकाँग, बेल्जियम, जर्मनी, झेक रिपब्लिक आणि ब्रिटनमध्ये या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये दोन जणांना या व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे.

गतीने बदलणारा विषाणू

कोरोना व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’चा प्राथमिक अहवाल धक्‍कादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ (गांभीर्याने घ्यावयाचा विषाणू) म्हटलेले आहे. ‘ओमिक्रॉन’मध्ये म्युटेशनही (बदल) वेगाने होत आहे. ओळख पटण्यापूर्वीच या व्हेरियंटमध्ये 32 म्युटेशन झालेले आहेत.

मनुष्याच्या पेशींत प्रवेश करण्यासाठी हा व्हेरियंट स्पाईक प्रोटिनचा वापर करतो. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटिनमध्येच 32 प्रकार आहेत आणि हेच शास्त्रज्ञांच्या चिंतेचे कारण आहे. व्हेरियंटमधील म्युटेशन हेच रोगप्रतिबंधक क्षमतेला चकवा देते आणि पुढच्या लाटेचे कारण ठरते. व्हेरियंटला नेमकेपणाने ओळखायचे, जोखायचे, तर शास्त्रज्ञांना किमान एक आठवडा तरी लागेल.

व्हायरसवरील रोगप्रतिबंधक क्षमतेची प्रतिक्रिया तपासायची, तर त्यासाठी आदर्श डेटा उपलब्ध होण्यास अनेक आठवडे लागतात. शास्त्रज्ञ वेळ मागत आहेत आणि काळाच्या प्रचंड गतीने ओमिक्रॉन पसरतो आहे. जगासमोर निर्माण झालेला हा भयंकर पेच होय.

Back to top button