

मुंबई : राज्यात संसर्गजन्य आजाराची रूग्णसंख्या वाढत असतानाच या आजाराने मृत्यूची संख्याही वाढत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी झाली आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठ महिन्यात ७५ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाले आहेत. राज्यात स्वाईन फ्लूने ३९ जणांचा बळी घेतला आहे, तर डेंग्यूने १७ जणांचा बळी घेतला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजारांनी राज्यातील जनतेला वेठीस धरले आहे. मात्र, या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. संसर्गजन्य आजारांसंदभात राज्य संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण उच्चस्तरीय समितीची आढावा बैठकही नुकतीच झाली. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य सेवा आयुक्त अमगोधू श्रीरंगा नाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यात ३२ विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत आरोग्य सेवा आयुक्त आमगोधू श्रीरंगा नाईक यांनी नागरी विभागासाठी उपनियम बनविण्यावर भर दिला आहे, तर अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सध्याच्या सणासुदीचा हंगाम आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाचे सहसंचालक राधाकिशन पवार यांनी राज्यातील संसर्गजन्य आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन समितीचे कार्य व उद्दिष्टे याबाबत मार्गदर्शन केले. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ७ सप्टेंबरपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचे एकूण १६१७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १६ मृत्यू झाले आहेत. त्याचप्रमाणे मलेरियाचे एकूण १३४१० रुग्ण आढळले असून त्यापैकी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर डेंग्यूचे १० हजार ५८६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिकुनगुनियाचे एकूण २६४३ रुग्ण आढळले आहेत. झिकाचे एकूण १२८ रुग्ण शहरी भागात आढळून आले आहेत. तसेच कॉलराचे ४३७ रुग्ण आढळून आले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
गॅस्ट्रोच्या ११९५ रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर कावीळच्या ४२६ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, लेप्टोच्या ६९५ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, टायफसच्या आठ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू आणि जलजन्य आजारांच्या २४४१रुग्णांपैकी १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात मलेरिया तपासणीसाठी ७५ तर डेंग्यूसाठी तपासणी साठी ५० अशी एकूण १२५ सेंटिनेल केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. येथे येणाऱ्या * रुग्णांची ओळख पटवून त्यांना तातडीने उपचार देण्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.