

- डॉ. संतोष काळे
अलीकडच्या काळात आरोग्याविषयीची जागरूकता वाढली आहे. त्यामुळे नियमित व्यायामाबरोबरच आहाराकडेही लक्ष दिले जात आहे. आहाराचा विचार करताना अनेकजण आरोग्यदायी आहार समजले जाणारे अन्नपदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करत आहेत; मात्र ते करताना आपली प्रकृती, जीवनशैली, शरीराची ठेवण आदी गोष्टींचा विचार केला जात नाही.
तसेच याबाबत डॉक्टरांशीही सल्लामसलत केली जात नाही. सरसकट माहितीच्या आधारावर आरोग्यदायी आहाराची संकल्पना ठरवली जाते आणि त्याचे सेवन केले जाते; मात्र अशा अन्नपदार्थांचा अती प्रमाणात समावेश केल्यास आपल्या आरोग्याला निश्चितच काही तोटेही होतात.
मुळात आरोग्यदायी आहार आणि संतुलित आहार यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आरोग्यदायी आहार म्हणजेच हेल्दी डायट घेण्यास काहीच हरकत नाही; मात्र त्यात सुसूत्रता असावी. असे केल्याने आहारातील पौष्टिक तत्त्वांचे संतुलन बिघडू शकते. आरोग्यासाठी अत्यंत उत्तम समजला जाणारा आहार (रिच डायट) हा फायबर, प्रोटिन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स या पौष्टिक घटकांनी युक्त असतो; मात्र या घटकांचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. सफरचंद, पपई, पेरू, चिक्कू, अंजीर अशी अनेक फळे आपण आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खात असतो.
अनेकजण भूक लागेल तेव्हा फ्रिज उघडतात आणि फ्रिजमध्ये ठेवलेली फळे काढून खातात. काहीजण फळांचे सॅलड बनवूनही खात असतात. फळांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिनचे प्रमाण भरपूर असल्याने फळे खाणे आरोग्याला चांगले समजले जाते; मात्र व्हिटॅमिन्स, फायबर, मिनरल्स यांचे प्रमाण अधिक झाल्याने शरीरातील अन्य पौष्टिक घटकांचे प्रमाण कमी होते.
सफरचंदात भरपूर फायबर आणि लोह असते; मात्र शरीराला फक्त फायबरची आवश्यकता असत नाही. शरीरात प्रमाणापेक्षा अधिक फायबर झाले, तर शरीरातील विषद्रव्यांबरोबरच शरीराला उपयोगी पडणारे अन्य घटकही बाहेर टाकले जातात. त्यामुळे पचनाच्या काही समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच फायबर, व्हिटॅमिन्सयुक्त पदार्थांचे प्रमाण एका मयदितच असले पाहिजे.
अनेकांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. भरपूर पाणी पिण्याने आपली पचनशक्ती चांगली राहते, असे आपल्याला सांगितले जाते. पाणी प्याल्याने शरीराला फायदे होतात; मात्र काहीजणांना भरपूर पाणी पिल्याने वारंवार मूत्र विसर्जनासाठी जावे लागते. यामुळे थकवा येऊ शकतो. शरीराला प्रथिनांची जरुरी असते.
विशेषतः लहान मुलांना प्रोटिनयुक्त आहार अत्यंत गरजेचा असतो; मात्र वय वाढू लागेल तेव्हा मात्र प्रोटिनयुक्त आहाराचे प्रमाण कमी असले पाहिजे. याचे कारण पन्नाशीनंतर अधिक प्रमाणात घेतल्यास आपल्या मूत्रपिंडाचे कार्य वाढते. हृदयाच्या आणि यकृताच्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता वाढते.
कारण, तुमचे वय वाढेल तशा तुमच्या शारीरिक हालचाली कमी होत जातात. त्यामुळे चाळीशी, पन्नाशीनंतर आहारातील प्रोटिनयुक्त पदार्थांचे प्रमाण संतुलित असावे. शरीराला मिळणाऱ्या उष्मांकापैकी कमीतकमी १० टक्के वाटा आणि जास्तीतजास्त ३० टक्के वाटा प्रोटिनयुक्त पदार्थांद्वारे आला पाहिजे.
काहीजण डॉक्टरांचा तसेच आहारतज्ज्ञांचा सल्ला न घेताच व्हिटॅमिन सप्लीमेंटस् आणि फोर्टीफाईड फूडचा समावेश आहारात करतात; पण व्हिटॅमिन्सचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त झाले, तर आपल्याला थकवा येतो. तसेच शरीरात आळस निर्माण होतो.
व्हिटॅमिन सी किंवा झिंकचे प्रमाण अधिक झाले, तर उलटी, अतिसार यांसारख्या समस्या जाणवतात. शरीरातील सेलेनियमचे प्रमाण अधिक झाले, तर अॅसिडीटी होते. तसेच केस गळण्याची समस्याही जाणवू लागते. व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढल्यास हृदयाच्या ठोक्यांची गती अनियमित होते. व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के यांचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक झाल्यास शरीरातील विषद्रव्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आहारात संतुलन असावे.
म्हणजेच कोणतीही दोन फळे, दोन प्लेट भाजी तसेच एक प्लेट सॅलड अशा प्रमाणात या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. दररोज एकच फळ खाऊ नये. फळे आलटून पालटून खावीत. दररोज आठ ते दहा ग्लास एवढेच पाणी पिले पाहिजे. सोयाबीनमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असते; मात्र कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी असते. असे असले, तरी अधिक प्रमाणात सोया खाल्ल्यास आपल्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.
विशेषतः महिलांच्या शरीरातील अॅस्ट्रोजनच्या पातळीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच पुरुषांमध्ये वंध्यत्वाची शक्यता सोयाबीनच्या अती प्रमाणामुळे वाढू शकते. ऑलीव्ह ऑईलचे प्रमाण शरीरात वाढले, तर शरीरात काही समस्या निर्माण होऊ शकतात. सबब देशी घाण्याचे सूर्यफूल, शेंगदाणा तेल या तेलांचाही वापर केला पाहिजे.
सुक्या मेव्याच्या पदार्थांचे अती प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे बदाम, पिस्ते, खजूर, खारीक, आक्रोड यासारखे पदार्थ खाताना त्याच्या प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाणे आवश्यक आहे. काजूसारखे पदार्थ तळून खाऊ नका.