Nana Patole : पटोलेंच्या एकला चलो रे नीतीने काँग्रेस संकटात.. | पुढारी

Nana Patole : पटोलेंच्या एकला चलो रे नीतीने काँग्रेस संकटात..

प्रमोद चुंचूवार

काँग्रेसचे हायकमांड असेलले राहूल गांधी यांच्या स्वभावाचा गुण किंवा दोष सांगितला जातो तो म्हणजे- ते एकदा कुणाच्या प्रेमात पडले की त्या व्यक्तीच्या विरोधात काहीही ऐकून घेत नाही! भाजपाचे खासदार असताना नरेंद्र मोदी यांना भर बैठकीत विरोध करून पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या कथित बाणेदार कृतीच्या प्रेमात राहूल गांधी पडले व पटोलेंना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. (Nana Patole)

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर नाना पटोलेंना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र त्यांना लगेच मंत्रीपदाचे डोहाळे लागले. पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित राज्यातील ठाकरे सरकारही कोसळले नसते,असे सांगितले जाते. विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशाच भावना व्यक्त करून पटोलेंचे आभार मानले.

नागपूर जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक लागली तेव्हा भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरूध्द लढण्यासाठी पटोलेंनी स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता भाजपमधून डॉ. रविंद्र भोयर यांना आणले. स्थानिक आमदारांनी यामुळे नाराज होऊन भोयर यांना सहकार्य करण्यास नकार दिला. तसेच ऐन मतदानाच्या एक दोन दिवसाआधी भोयर यांनी मैदानातून पळ काढला तेव्हा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली. खरेतर हे पटोलेंचे अपयश होते. नागपुरातून २०१९ च्या लोकसभेत ते स्वतः पराभूत झाले आणि नंतर विधान परिषदेत त्यांचा उमेदवार. ही बाब गांभीर्याने घेऊन पटोलेंना तेव्हाच प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवायला हवे होते. (Nana Patole)

पक्षाध्यक्ष आणि मंत्रीपद दोन्ही मिळावे यासाठी आग्रही असलेल्या पटोले यांनी पक्षाध्यक्ष असताना आपल्याला ऊर्जा मंत्री पद मिळावे म्हणून प्रयत्न सुरू केले. आपल्याच पक्षाचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्यावर त्यांनी टीका व गंभीर आरोपही केले. खरेतर पक्षाच्या अध्यक्षाने आपल्या मंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे असते. मात्र पक्षाचे भलेही काही झाले तरी चालेल आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात, असा विचार करून पटोलेंनी आपल्याच मंत्र्याला, आपल्याच सरकारला अनेकदा अडचणीत आणले.

सरकार कोसळल्यानंतर तरी ते पक्षबांधणीकडे लक्ष देतील, ही आशाही फोल ठरली. काँग्रेससारख्या पक्षात आज बाळासाहेब थोरात यांच्यासारखे ९ वेळा आमदार झालेले नेतृत्व आहे. अशोक चव्हाण होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेतेही पक्षात आहेत. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन जाण्यात ते पूर्ण अपयशी ठरले आहेत. आपल्यापेक्षा वय आणि कतृत्व यांनी ज्येष्ठ असलेल्या माजी मुख्यमंत्री वा मंत्री राहिलेल्या नेत्यांना ते अनेकदा एकेरीत संबोधतात. बैठका आयोजित करायच्या, ज्येष्ठ नेत्यांनी वेळेवर पोहोचायचे व स्वतः मात्र दोन-तीन तास उशीरा यायचे असे प्रकारही त्यांनी अनेकदा केले आहेत.

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे प्रकरणी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसने हक्काची जागा गमावली. थोरात दुखावले आणि त्यांनी विधानमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्ष म्हणून ते विविध जिल्ह्यात जातात तेव्हा तेथील प्रमुख नेत्यांनाच अनेकदा त्यांचा कार्यक्रम माहित नसतो. त्यांच्याकडून तशी सूचना गेलेली नसते. पक्षाच्या नेत्याच्या विरोधकांना काँग्रेस पक्षात प्रवेश देताना संबंधित नेत्याला विश्वासात घेण्याची तसदीही ते घेताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी ते पुण्यात गेले तेव्हा काँग्रेस नेते रमेश बागवे यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत काम करणा-या एका नेत्याला त्यांनी बागवेंना न विचारता परस्पर प्रवेश देऊन टाकला. मात्र त्यानंतर बागवेंनी आक्षेप घेतल्यावर हा प्रवेश रद्द करण्याची वेळ आली.

लोकसभा वा इतर निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी करणे, त्यासाठी सूक्ष्म व्यवस्थापन करणे, बूथ लेव्हल व्यवस्थापन करणे या बाबी तर पटोलेंच्या गावीच नसल्याचे दिसते. लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी आजही अनेक जिल्ह्यात काँग्रेसला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नाहीत, हंगामी जिल्हाध्यक्षांच्याभरोसे कारभार चालू आहे. जिल्हास्तरीय, विभागस्तरीय काँग्रेसच्या बैठका घेऊन आढावा होणे अपेक्षित असते. मात्र जिल्हा पातळीवर अतिशय कमी आढावा बैठका झाल्यात. विभागीय पातळीवर रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काही बैठका झाल्या. मात्र या आढावा बैठकांमध्ये स्थानिक नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी पटोले व इतरांची भाषणेच अधिक होतात. त्यामुळे पक्ष मजबूत करण्यासाठी चिंतन होताना दिसत नाही.

समाजाचे विविध घटक वा सामाजिक क्षेत्रातील संघटनांना पक्षासोबत जोडण्यासाठी त्यांनी काहीही ठोस केलेले नाही. तसेच एखाद्या प्रश्नावर काम करणारे काँग्रेस पक्षाचे नेते वा कार्यकर्ते कसे अपयशी ठरतील, असेच त्यांचे प्रयत्न असल्याची चर्चा आज काँग्रेसमध्ये रंगली आहे.  (Nana Patole)

त्यामुळे अनेक सहकारी नेते व आमदार यांच्या मनातून ते उतरले आहेत. परिणामी आज या नेत्यांसोबत त्यांचा सकारात्मक संवाद संपला आहे. केवळ भाषणे ठोकून, भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेस निवडणूक जिंकेल, असा गैरसमज त्यांनी करून घेतल्याचे दिसते. त्यामुळे भाजप व त्यांच्या मित्र पक्षासोबत मैदानावर लढण्यासाठी विशेष तयारी व रणनीती आखण्याबाबत ते निष्क्रीय झालेले दिसतात. मोदी सरकार वा शिंदे सरकार यांच्याविरोधात रान उठविण्यासाठी अनेक मुद्दे असताना काँग्रेसने आक्रमक आंदोलने करून जनतेचे प्रश्न मांडली, असेही झालेले नाही. त्यांचा फोन सदैव बंद असतो.त्यामुळे त्यांच्याशी संपर्क कसा करायचा, हा प्रश्न केवळ पत्रकार व कार्यकर्तेच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही पडला आहे. सर्वसामान्य काँग्रेसजनांसाठी ते नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याबद्दल आज काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांमध्ये इतका अविश्वास निर्माण झाला आहे की काँग्रेस संपविण्यासाठी पटोलेंना भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये पाठविले आहे, असे आता सामान्य काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही खासगीत बोलू लागले आहेत. अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यावर खरेतर पटोले नांदेडमध्ये जाऊन मुक्काम ठोकतील पक्ष सोडून न जाण्यासाठी काँग्रेसजनांची मनधरणी करतील, ही अपेक्षा होती. मात्र असे झालेले दिसत नाही. पक्षातील मराठा नेतृत्वही पटोलेंवर नाराज आहे आणि ते केवळ एका विशिष्ट जातीला व विशिष्ट प्रदेशातील लोकांनाच महत्व देतात अशी टीका होऊ लागली आहे. (Nana Patole)

काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांना, कार्यकर्त्यांमध्ये आज कमालीची निराशा पहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाला आज पूर्ण मरगळ आली असून राज्य पातळीवर पक्ष कोलमडण्याच्या बेतात पक्षाचे आहे. अर्थात प्रदेश काँग्रेसचे कमालीचे नुकसान झाल्याशिवाय, निवडणुकीत धुळधाण झाल्याशिवाय राहूल गांधींचे व काँग्रेस हायकमांडचे डोळे उघडत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. प्रदेश काँग्रेसला आज रेवंथ रेड्डी वा डी.के.शिवकुमार यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची गरज असताना पटोलेंसारखे पक्षात एकला चलोरेच्या भूमिकेत जगणारे नेतृत्व असल्याने काँग्रेसच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हेही वाचा :

Back to top button