कुवेतमध्ये अडकलेले नाशिककर सुखरूप परतले | पुढारी

कुवेतमध्ये अडकलेले नाशिककर सुखरूप परतले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तीन महिन्यांपूर्वी नोकरीनिमित्ताने नाशिकचे दोन तरुण इराणमध्ये जात असताना कुवेतच्या किनाऱ्यावर जहाज बुडाले. यात नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. पण कागदपत्रे, पासपोर्ट नसल्याने तेथील तुरुंगात अडकले. मात्र, ऑल इंडियन सिफेरर्स युनियनने सातत्याने पाठपुरावा करत या दोन्ही तरुणांना मायदेशी परत आणले आहे. आविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या या तरुणांची नावे आहेत.

नोकरीसाठी दोघेही इराणला गेले होते. जहाजावर नोकरी करत असताना १९ जानेवारी रोजी त्यांचे जहाज बुडाले. यात ७ पैकी ५ जणांना जलसमाधी मिळाली. मात्र, हे दोघेही सेल्फ बोटीने किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. कुवेतच्या किनाऱ्यावर आल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. कोणतेही कागदपत्रे नसल्याने त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, इराणच्या एका निरीक्षकाने केलेल्या ट्विटने ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने कुवेत सरकारसोबत पत्रव्यवहार करत त्यांना सुखरूप भारतात आणले आहे. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने यापूर्वी अशा प्रकारे विदेशात अडकलेल्या तरुणांची सुटका केली आहे. यावेळी अडचणी जास्त होत्या. मात्र, तरीदेखील सर्व कागदपत्रे, ओळखीचे पुरावे यांची मदत त्यांना झाली.

एका ट्विटमुळे मिळाली माहिती
इराणचे निरीक्षक झानी यांनी केलेले ट्विट ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी बघितले. तत्काळ झानी यांना फोनवर संपर्क करून अधिक माहिती घेतली. तसेच कुवेत दुतावासासोबत मेलद्वारे पत्रव्यवहार सुरू ठेवला.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची
दोन खलाशी कुवेतमध्ये अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांसोबत युनियनने संपर्क केला. कुवेतमधील भारतीय दुतावासाने दखल घेत कागदपत्रे जमा करून कुवेत सरकारला सादर केले. तत्काळ दोघांचे पासपोर्ट बनविण्यात येऊन भारतात आणण्याची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालयाने केली. त्यासोबतच युनियनला देखील दोघे मुंबई आणि घरी पोहोचल्याचे छायाचित्र पाठविण्याच्या सूचना केल्या.

माहिती मिळाल्यानंतर अवधी न दवडता संघटनेच्या वतीने इराण, कुवेत शासन, कुवेत दुतावास, भारतीय परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दुतावास यांसोबत पत्रव्यवहार सुरू केला. मुलांचे सर्व कागदपत्रे जमविली. या काळात मुलांचे कुटुंबीय खचू नये, म्हणून आम्ही त्यांना आधार देण्याचे कामदेखील केले. – अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन.

महिन्यापासून कुवेतमध्ये अडकलो होतो. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे तेथून सुटका झाली व मायदेशी परतलाे. आपल्या मातीत आल्याने वेगळाच आनंद मिळाला आहे. अटक झाल्याने पुन्हा आपल्या देशात येण्याच्या आशा मावळल्या होत्या. मात्र, युनियनमुळे पुन्हा भारतात येता आले. –आविष्कार जगताप, निवृत्ती बागूल, नाशिक

Back to top button