Raj Purohit : राज पुरोहितांचे भाजपातील अस्तित्व धोक्यात | पुढारी

Raj Purohit : राज पुरोहितांचे भाजपातील अस्तित्व धोक्यात

मुंबई : राजेश सावंत : दक्षिण मुंबईत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे भाजप नेते राज पुरोहित (Raj Purohit) यांचे पाच ते सहा वर्षापासून भाजपानेच पंख छाटण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर या दोन बंधुंनाच उतरवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुरोहित यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. (Raj Purohit)

दक्षिण मुंबईत भाजपा नेते राज पुरोहित (Raj Purohit) यांचा चांगलाच दबदबा होता. कुलाबा विधानसभा मतदारसंघात मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपामधून कोणाला उमेदवारी द्यायची, हे सर्वस्वी पुरोहित यांच्यावर अवलंबून होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्येही पुरोहित यांनी आपला मुलगा आकाश पुरोहित व आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास भाजपाला भाग पडले होते. मात्र त्यानंतर दक्षिण मुंबईत भाजपची नवीन फळी उभी राहिली. व त्याचे नेतृत्व राहुल नार्वेकर करू लागले. २००९ व २०१४ मध्ये राजपुरोहित यांना कुलाबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर २०१४ मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुरोहित यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण त्यांचा पत्ता कापत राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर पुरोहित यांचे दक्षिण मुंबईतील अस्तित्व डळमळीत झाले.

भाजपच्या पुरोहितविरोधी (Raj Purohit) कार्यकर्ते नार्वेकरांच्या तंबूत दाखल झाले. यात माजी नगरसेवक जनक संघवी यांचा सहभाग आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कुलाबा विधानसभेमध्ये पुन्हा राज पुरोहित यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण भाजपाचे वरिष्ठ नेते पूर्वी त्यांच्यावर नाराज असल्यामुळे विधानसभेची उमेदवारी नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांना देण्यासाठी मुंबईतील भाजप नेते आग्रही आहेत. मकरंद नार्वेकर यांना विधानसभा उमेदवारी देण्यासंदर्भात दोन ते तीन वर्षांपूर्वीच निश्चित झाले होते. भाजप नेत्यांनी त्यांना विधानसभा मतदारसंघ बांधा, अशा सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण विधानसभेमध्ये मकरंद नार्वेकर यांचे बॅनर व कटआउट झळकले होते. आता तर त्यांना पूर्णपणे ग्रीन सिग्नल मिळाला असल्यामुळे पुरोहित यांचा पत्ता जवळपास कापला गेल्याचे बोलले जात आहे.

महापालिका निवडणुकीतही नार्वेकर समर्थकांना संधी!

कुलाबा विधानसभेमध्ये महापालिका ६ प्रभाग येतात. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक २२६ व २२७ मध्ये अनुक्रमे नार्वेकर कुटुंबातील मकरंद नार्वेकर व हर्षिता नार्वेकर निवडून आले होते. तर प्रभाग क्रमांक २२१ मध्ये राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित तर प्रभाग क्रमांक २२२ मध्ये पुरोहित समर्थक रिटा मकवाना निवडून आले होते. त्यावेळी नार्वेकर समर्थक माजी नगरसेवक जनक संघवी यांचा पत्ता कट करण्यात आला होता. मात्र यावेळी संघवी यांना महापालिका निवडणूकमध्ये उतरवण्यासाठी स्वतः नार्वेकर आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य प्रभागातही आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी नार्वेकर प्रयत्नशील असल्याचे समजते.

हेही वाचा : 

Back to top button