Sharad Pawar Dinner Invitation: शरद पवारांची जेवणाची गुगली शिंदे, फडणवीसांनी टोलवली: अजितदादांच्या निर्णयाकडे लक्ष | पुढारी

Sharad Pawar Dinner Invitation: शरद पवारांची जेवणाची गुगली शिंदे, फडणवीसांनी टोलवली: अजितदादांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बारामती दौऱ्यावर शनिवारी (दि. २) येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. परंतु, नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री यांनी भोजनाला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यस्त कार्यक्रमामुळे भाजनासाठी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र शरद पवार यांना पाठविले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. Sharad Pawar Dinner Invitation

त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. Sharad Pawar Dinner Invitation

दरम्यान, शरद पवार यांनी यासंबंधी निमंत्रणाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात, शनिवारी आपण बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच या दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.

आपण मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. मंत्रिमंडळातील मेळाव्यानंतर सहकाऱ्यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत शरद पवार यांच्याकडून फडणवीस व अजित पवार यांनाही देण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button