Sharad Pawar : शरद पवार यांची आणखी एक गुगली ! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण | पुढारी

Sharad Pawar : शरद पवार यांची आणखी एक गुगली ! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण

बारामती : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि. २) बारामती दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांची आणखी एक गुगली राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar : काय आहे पत्रात

शरद पवार यांनी यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात, शनिवारी आपण बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच यादिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.

आपण मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. मंत्रिमंडळातील
मेळाव्यानंतर सहकाऱ्यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत शरद पवार यांच्याकडून फडणवीस व अजित पवार यांनाही देण्यात आली आहे.

उलटसुलट चर्चा

बारामतीत आयोजित महारोजगार मेळावा कार्यक्रमपत्रिकेत शरद पवार यांचे नाव नमूद नाही. बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. त्यात आता शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये स्वागत करण्यास आनंद होईल आणि गोविंदबागेत आतिथ्य भोजनाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या नव्या गुगलीमुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे निमंत्रण स्वीकारतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

 

Back to top button