Eknath Shinde vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, पक्ष निधीतून ५० कोटी काढल्याप्रकरणी चौकशी सुरु | पुढारी

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, पक्ष निधीतून ५० कोटी काढल्याप्रकरणी चौकशी सुरु

पुढारी ऑनलाईन : निवडणूक आयोगाने शिंदे गट (Eknath Shinde faction) हीच खरी शिवसेना म्हणून जाहीर केले. असे असूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (UBT faction) पक्ष निधीतून ५० कोटी रुपये काढल्याची तक्रार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या विरोधात केलेल्या या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) चौकशी सुरू केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनेदेखील आयकर विभागाला पत्र लिहून उद्धव ठाकरे गटाचा कर कोण भरत आहे? याची माहिती मागवली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

आता आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कोणत्या बँक खात्यातून पक्ष निधीची रक्कम काढण्यात आली. ते खाते कोण ऑपरेट करते आणि कोणी पैसे काढले याची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एवढेच नाही तर आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागाला पत्र लिहून निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यापासून ठाकरे गटाचा कर कोण भरत आहे?, याची माहिती मागवली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही खरी शिवसेना नसून ते पक्ष निधी काढू शकत नाही. तरीही त्यांनी पक्ष निधीतून ५० कोटी रुपये कसे काढले? असा सवाल शिंदे गटाने केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण दिले. त्यानंतर आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, शिवसेना पक्ष हा बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही नार्वेकर यांनी वैध ठरवत, शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरविले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार निघून गेली होती.

हे ही वाचा :

Back to top button