Mard Doctors Strike : राज्यात मार्ड डाॅक्टरांचा संप सुरूच; पहिल्या दिवशी रुग्णसेवेवर परिणाम नाही | पुढारी

Mard Doctors Strike : राज्यात मार्ड डाॅक्टरांचा संप सुरूच; पहिल्या दिवशी रुग्णसेवेवर परिणाम नाही

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर पगारवाढ, प्रलंबित भत्ते, वेळेवर न मिळणारे मानधन, वसतिगृहाच्या समस्या या मागण्यांसाठी गुरूवार सायंकाळीपासून संपावर आहेत. संपामुळे आरोग्य सेवेवर फारसा परिणाम झालेला नसून रूग्णालयातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ डॉक्टर आणि आरएमओ यांनी आज (दि.२३) ओपीडीमध्ये तैनात होते. मात्र, निवासी डॉक्टर अत्यावश्यक सेवा देत आहेत. Mard Doctors Strike

राज्यातील राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय जागांमध्ये वाढ झाल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्याही वाढली, मात्र वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहांच्या सुविधांमध्ये फारसा बदल झालेला नाही, त्यामुळे चार ते पाच निवासी डॉक्टरांना एका खोलीत राहावे लागत आहे. तसेच, शुल्क वाढीशिवाय निवासी डॉक्टर मिळत नसल्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या सेंट्रल मार्डने गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बेमुदत संप पुकारला आहे. मानधन वेळेवर आणि मानधनात वाढ नाही. सेंट्रल मार्डच्या या संपाला पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना बीएमसी मार्डने पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संपाच्या काळात रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.अभिजीत हेलगे यांनी सांगितले. Mard Doctors Strike

जेजे ग्रुपच्या अंतर्गत असलेल्या सर्व रूग्णालयांमध्ये आरएमओ, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टर ओपीडीमध्ये तैनात असणार असल्याचे जे जे रूग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. जे जे रूग्णालयात शुक्रवारी ओपीडीमध्ये १ हजार ८४२ रूग्णांवर उपचार करण्यात आले तर ६४ रूग्णांना दाखल केले तर ५१ मोठ्या शस्त्रक्रिया आणि ४५ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Mard Doctors Strike  : मार्ड प्रतिनिधींची बैठक निष्फळ

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी राज्यातील निवासी डाॅक्टर ऑफलाइन आणि ऑनलाइन बैठकीमध्ये सहभागी झाले होते. मात्र या बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली असून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे डाॅ. अभिजीत हेलगे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button