पुणे; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय महाविद्यालयांत 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती करण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था दूर करावी, निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड थांबवावी, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची अपुरे पदे तातडीने भरण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेचे (मार्ड) डॉक्टर आजपासून (दि.2) संपावर जाणार आहेत. यामध्ये ससून रुग्णालयातील 600 निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे. अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कार्यरत असणार्या डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे शासनाने लक्ष दिले नाही, अशी माहिती पुण्यातील मार्ड संघटनेचे सचिव डॉ. घुगे यांनी दिली.