SSC, HSC Board Exam : टेन्शन काय कु लेताय रे… बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यी आणि पालकांनी अशी घ्यावी काळजी

SSC, HSC Board Exam : टेन्शन काय कु लेताय रे… बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यी आणि पालकांनी अशी घ्यावी काळजी

बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा जवळ आली आहे. परीक्षेचा ताण न घेता वेळेचे काटेकोर नियोजन, अभ्यासाचे व्यवस्थापन आणि सकस आहाराचे संयोजन या त्रिसूत्रीचा वापर केल्यास 'नो टेन्शन.' मुलांनी आणि पालकांनी जपावे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. ताणाला सामोरे जा सहजतेने. जे हाती आहे, त्याचा करा विचार. जे हाती नाही, त्याचा कशाला करता हो विचार? असे केले तर गायब होतो तो ताण. तज्ज्ञ मंडळींचेच हे सल्ले. (SSC HSC Board Exam)

संबंधित बातम्या : 

SSC HSC Board Exam : होय, ताण-तणावावर मात शक्यच

इस्लामपूरस्थित मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कालिदास पाटील म्हणाले, परीक्षा काळात ताण- तणाव येणे नैसर्गिक. त्यावर मात करण्यासाठी वेळेचे नियोजन, विचारांचे व्यवस्थापन महत्त्वाचे. क्षमता काय आहेत आणि कोठे पोहोचायचे आहे याचा वास्तव विचार करा. गुण किती मिळतील हे हातात नाही. परंतु अभ्यास करणे आपल्या हातात आहे. आहाराचे, भावनांचे नियोजन करा. उगाच अवास्तव कल्पनाविश्वात रमल्यास होतो केमिकल लोच्या. त्यामुळे मनाची एकाग्रता ढळते. ती वाढवणे आणि आकलनशक्ती विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. शिक्षकांनीही अभ्यासक्रम संपवण्याची घाई करू नये. मुलांना अभ्यास लक्षात ठेवण्याच्या सोप्या पध्दती, घोकंपट्टीवर भर न देता मनोरंजक भाषेत संकल्पना समजावून सांगाव्यात. ज्यामुळे हसत-खेळत अभ्यास समजावून घेता येईल. (SSC HSC Board Exam)

SSC HSC Board Exam : संवाद साधावा

सांगलीस्थित समुपदेशक अर्चना मुळे म्हणाल्या, मुलांना परीक्षाकाळात ताण येऊ नये किंवा आलेला ताण हलका व्हावा यासाठी पालकांनी विशेष काळजी घ्यावी. मुलांना सतत अभ्यासात गुंतवून ठेवू नये. त्यांना स्वतःचा असा वेळ द्यावा. त्यांना नेमके काय अवघड वाटते याची उकल करून द्यावी. संवाद साधावा. जेणेकरून त्यांची परीक्षेबद्दलची भीती पळून जाईल.

SSC HSC Board Exam : विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी

  • लिखाणाचा सराव रोज करा
  • ऐनवेळी अभ्यास आठवेल की नाही, असा ताण घेऊ नये
  • टीव्ही, मोबाईलला द्या सुटी
  • रोज ठरावीक तास अभ्यास करा
  • एक तास स्वतः साठी ठेवा
  • आवडीच्या गोष्टी, छंदासाठी थोडा वेळ खर्च करा
  • लवकर झोपा, लवकर उठा
  • सकस आणि पौष्टिक आहार, निर्जंतुक पाणी भरपूर प्या
  • सकाळी हलका व्यायाम, योगासने, प्राणायाम करा

SSC HSC Board Exam : पालकांनी घ्यावयाची काळजी

  • मुलांच्या मागे अभ्यास कर… असा तगादा लावू नका
  • नकारात्मक विचार मांडू नका
  • मुलांमध्ये विश्वास वाढेल असा संवाद साधा
  • मुलांकडून अवास्तव अपेक्षा करू नका
  • वेळेचे व्यवस्थापन, आहाराचे योग्य नियोजन करा
  • कुटुंबातील वातावरण निकोप ठेवा
  • स्वतः मोबाईल कमी वापरा
  • मुलांसोबत अभ्यासात सहभाग घ्या, त्याची भीती दूर होते

(संकलन : मृणाल वष्ट)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news