दीड वर्षानंतर शाळेत होणार चिमण्या पाखरांची किलबिल | पुढारी

दीड वर्षानंतर शाळेत होणार चिमण्या पाखरांची किलबिल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

तब्बल दीड वर्षानंतर गावागावांतील शाळांमध्ये पाखरांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष (ऑफलाईन) सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नेमकी काय खबरदारी घ्यावयाची, याची नियमावली लवकरच जाहीर केली जाईल.

कोरोनाचा काळ असल्याने मुलांची सुरक्षितता आणि आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. दुसरी लाट उतरणीला लागल्यानंतर मागील महिन्यात शहरी भागातील आठवी ते बारावी, तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले होते.

दिवाळीनंतरही कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता राहिल्याने लहान मुलांच्या टास्क फोर्सने पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. आरोग्य विभागानेही याला होकार दिल्यानंतर शालेय विभागाने पहिली ते बारावीचे सर्व वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला.

यावेळी टास्क फोर्सचे म्हणणे आणि आरोग्य विभागाने केलेल्या सादरीकरणानंतर पहिलीपासून सर्व शाळांचे वर्ग सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाची सद्यस्थिती, संसर्गवाढीचा संभाव्य वेग, त्याचे परिणाम आणि शाळा भरल्यानंतरचा परिणाम, याचा विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यापासून शाळा सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत होती.

 

मोबाईलपासून मुक्ती, पालकवर्गही सुखावला!

गेल्या दीड वर्षापासून घरातच ‘ऑनलाईन’ धडे गिरवून वैतागलेल्या चिमुकल्यांचा एक डिसेंबरपासून शाळांमध्ये किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. कोरोनाच्या काळात मुलांचा टी.व्ही., मोबाईलवरील स्क्रीन टाईम वाढला होता. त्यामुळे पालकवर्ग चिंतेत होता. परंतु, आता शाळा सुरू होणार आहेत. दुसरीकडे, घरी राहून आळसावलेल्या मुलांना आता आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत अभ्यास आणि धमालही करता येणार आहे.

 

Back to top button