गोरेगाव शहरात पेट्रोल-डिझेल चोरांचा सुळसुळाट | पुढारी

गोरेगाव शहरात पेट्रोल-डिझेल चोरांचा सुळसुळाट

गोरेगाव ः पुढारी वृत्तसेवा :  लोणेरे गोरेगाव शहरात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या वेळी पेट्रोल-डिझेल आणि गाडीतील साऊंड सिस्टम चोरीच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे यातील काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यात.

संबंधित बातम्या 

लोणेरे गोरेगाव रोड गोरेगाव शहर विद्यापीठ रोड रेपोली तळेगांव भागात रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. रेपोली येथील राजेश बेंदुगडे यांचे दुकान देखील रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने फोडले परंतु हाती काहीच लागले नसल्याने रागाने दुकान पेटवून देण्यात आले. अनेकदा नागरिकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना तोंडी माहिती दिली जाते. मात्र पुरावे नसल्याने घटनेकडे दुर्लक्ष केल जात.

लोणेरे गोरेगाव शहरातील विविध भागांत अश्या घटना सातत्याने घडतात. गोरेगाव पोलिसांनी या भुरट्या चोरांना पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज आहे. तरच लोणेरे गोरेगाव परिसरातील नागरिक निर्धास्तपणे झोपू शकतील. भुरट्या चोरट्यांनी गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. डिझेल, पेट्रोल चोरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. नोकरी नाही, की घरातून पैसे दिले जात नाहीत. परंतु व्यसनाच्या आहारी आणि ऐशारामात जगण्याची शरीराला लागलेली सवय सहजासहजी बंद करता येत नाही. त्यामुळे काही टोळक्यांकडून या चोर्‍या केल्या जात असल्याची चर्चा नाक्यावर आहे. या भुरट्या चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

घरासमोर, पार्किंग केलेल्या गाड्यांच्या पेट्रोल, डिझेल टाक्या रातोरात रिकाम्या केल्या जात आहेत. पैसा कमविण्याची अक्कल नाही, घरांतून पैसे दिले जात नाहीत, तर आपलं चालणार कसं म्हणून काही टोळक्यांनी चोरीचा सपाटा लावला आहे. स्वत:च्या गाडीत चोरीचे पेट्रोल घालून दुसर्‍याना कमी दरात विकत देण्यामध्येही ते माहीर आहेत. दारूच्या आहारी गेलेले नेहमी तोंडात मावा किंवा गुटखा चघळत बिनदिक्कतपणे चोरटे फिरत असल्याची चर्चा आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी मोटारसायकलवरून जावे लागते.

त्यामुळे त्यांना नेहमी गाडीमध्ये पुरेसे पेट्रोल ठेवावे लागते. बहुतांशी लोक पगार झाला की, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलची टाकी फुल्ल करतात. हे चोरट्यांना चांगलेच माहीत असते. आपल्या गल्लीत कोण राहते. कोणाच्या मोटारसायकलीमध्ये पेट्रोलचा साठा जास्त असतो.

गाडी फुल्ल केली की, त्या रात्री टाकी रिकामी करण्यासाठी ते दिवसभर फिल्डिंग लावतात. रात्री सर्वजण झोपलेत का याचा अंदाज घेतात. मध्यरात्री तीन ते चारच्या सुमारास सर्वत्र स्मशान शांतता असते अशावेळी गुलाबी थंडीत हे टोळके चोर्‍या करत नागरिकांना गरम करतात अश्या चोरट्यांचा गोरेगाव पोलिसांनी लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Back to top button