Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने. . .

file photo
file photo

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि भाजपकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाण्याची चर्चा होती. मात्र, पहिल्या यादीत भाजपने तीन तर काँग्रेसने एकाच उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. दोन्ही पक्षांकडून अद्याप अतिरिक्त उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेसकडून आणखी उमेदवारांची घोषणा न झाल्यास राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. Rajya Sabha Election

सहा जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदानाचा दिवस आहे. तर, १५ तारखेला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार केल्यास सहा पैकी तीन जागी भाजप आणि उर्वरित तीन जागांवर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता. Rajya Sabha Election

राज्यसभा निवडणुकीतील विजयासाठी साधारण ४१ मतांचा कोटा गृहित धरला जात होता. त्यामुळे काँग्रेसकडे स्वतःची ४४ आणि ठाकरे गटाची १४ तसेच शरद पवार गटाच्या डझनभर आमदारांची अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविणार असून दुसरा उमेदवार देण्याची चाचपणी करत असल्याचे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावर, काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्यास चौथा उमेदवार रिंगणात आणण्याचे संकेत भाजपने दिले होते. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूकही राजकीय हादरे देणारी ठरणार का ?, अशी शक्यता वर्तविली जात होती.

दरम्यान, भाजपने अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश घडवून काँग्रेसला धक्का दिला. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याने पक्षांतर केल्याने आधीच काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले. अशात मविआ म्हणून दुसरा उमेदवार दिल्यास त्यांचा पहिला उमेदवारही अडचणीत येण्याची शक्यता भाजपने अधोरेखित करून ठेवली आहे. तुर्तास भाजपने तीन, शिंदे गटाने आणि काँग्रेसने प्रत्येकी एक एक उमदेवार दिला आहे. अजित पवार गटही एकच उमेदवार जाहीर करणार आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसने अधिकचे उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news