Rajya Sabha election 2024 : राज्यसभेच्या उमेदवारीतून भाजपने साधले ‘सोशल इंजिनिअरिंग’

Rajya Sabha election 2024
Rajya Sabha election 2024

मुंबई : भारतीय जनता पार्टीने आज राज्यसभेसाठी आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांच्या नावांवर केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले. यातील अशोक चव्हाण यांचा अपवाद वगळता अन्य दोन्ही नावांची कुठेच चर्चा नव्हती. याबाबत पक्षाने धक्कातंत्रांचा आपला शिरस्ता कायम ठेवला आहे. जोडीलाच अनुक्रमे मराठा, ब्राह्मण आणि ओबीसी उमेदवार देत जातीय समीकरणाचेही संतुलन साधले आहे.

राज्यसभेसाठी भाजपचे तीन संभाव्य उमेदवारांमध्ये अनेक नावे घेतली जात होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर अशी डझनभर नावांची राजकीय वर्तुळात होती. मात्र, भाजपची जी नावे चर्चेत येतात त्यांचा पत्ता कट होतो, हा मोदी-शाहांच्या भाजपाचा शिरस्ता बनला आहे. आज जाहीर झालेली तिन्ही नावे याच धक्कातंत्राला अनुसरून आली आहेत. अशोक चव्हाण यांनी दोनच दिवसांपुर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काल घाईघाईत भाजप प्रवेश पडला आणि २४ तासांत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अशोक चव्हाण यांच्या निमित्ताने भाजपाने जातीय संतुलनही साधले आहे. मराठा ओळख शिवाय मराठावाड्यातील अशोक चव्हाणांचा प्रभाव भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. शिवाय, काँग्रेसमधील अस्वस्थता टिपण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून करण्याचा सुतोवाच स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने ब्राह्मण उमेदवार देत पुण्यातील बिघडलेले राजकीय गणित सुधारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावरून ब्राह्मण समाजातील नाराजी पाहायला मिळाली. पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसला होता. येथून महाविकास आघाडीच्या रवींद्र धनगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने ब्राह्मण चेहऱ्याचा भाजपचा शोध अद्याप संपलेला नाही. मात्र तुर्तास मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना ब्राह्मण फॅक्टर अडचणीचा ठरणार नाही, याची तजवीजही केली.

तर, डाॅ. अजित गोपछडे यांच्या रूपाने ओबीसी उमेदवार देण्यात आला. प्रचारक राहिलेले गोपछडे हे अनेक वर्षापासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. एकीकडे ओबीसी नेतृत्वाला संधी तर दुसरीकडे पक्ष संघटनेलाही महत्व दिला जात असल्याचा संदेश यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये पोहचला आहे. बाहेरून नेते आयात होत असले तरी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात नाही, हा संदेश यानिमित्ताने अधोरेखित केला गेला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news