JEE Mains 2024 Result | प्रेरणादायी यश! शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! जेईई मेन परीक्षेत हर्षवर्धन आगम याला ९७.८२ टक्के गुण | पुढारी

JEE Mains 2024 Result | प्रेरणादायी यश! शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! जेईई मेन परीक्षेत हर्षवर्धन आगम याला ९७.८२ टक्के गुण

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत हर्षवर्धन शहाजी आगम या विद्यार्थ्याने ९७.८२ टक्के गुण मिळवले. हर्षवर्धन हा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाचवडे गावचा. त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. पण त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जेईई मेन परीक्षेत यश मिळवले आहे हे विशेष! (JEE Mains 2024 Result)

हर्षवर्धनचे वडील शहाजी आगम शेती आणि शेळीपालन करुन मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहेत. त्यांना दोन मुली, एक मुलगा अशी अपत्ये आहेत. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांची पत्नीही शेतात काबाडकष्ट करते. मला परिस्थितीमुळे शिकता आले नाही. पण माझ्या मुलांनी शिकून मोठे अधिकारी व्हावे, अशी शहाजी यांची इच्छा आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, ”ज्यावेळी जेईई मेन परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मी शेतात काम करत होते. हर्षवर्धनला ९७ टक्क्यांच्यावर गुण मिळाल्याचे कळताच आनंदअश्रू आवरेनात. कठीण परिस्थितीतून त्याने हे यश मिळवले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. त्याला IIT ला प्रवेश घ्यायचा आहे.”

हर्षवर्धन शाळेत नेहमीच टॉपर राहिला आहे. तो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात नववा, NMMS परीक्षेत राज्यात दहावा आला होता. दहावीत त्याला ९७.२० टक्के गुण मिळाले होते. दहावीपर्यंतचे त्याचे शिक्षण जवाहर हायस्कूल, निळपण येथे मराठी माध्यमातून झाले. आता तो मुदाळ येथील प.बा. पाटील विद्यालयात बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे. त्याला शिक्षणासाठी शाळेतून आर्थिक मदत आणि शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

राज्यातील तीन विद्यार्थी जेईई मेन परीक्षेत टॉपर

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशभरातील २३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० एनटीए गुण मिळविले आहेत. यात सर्वाधिक सात विद्यार्थी तेलंगणा राज्यातील असून महाराष्ट्रातील आर्यन प्रकाश, नीलकृष्णा गजरे आणि दक्षेक्ष मिश्रा या तीन विद्यार्थ्यांनी १०० एनटीए गुण मिळवत या यादीत स्थान मिळवले आहे. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील पेपर १ (बीई, बीटेक) परीक्षेसाठी १२ लाख २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ७० हजार ४८विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मुली ३ लाख ८१ हजार ८०७ आणि मुले ७ लाख ८८ हजार २३५ इतके होते. खुल्या वर्गातून ३ लाख ९२ हजार ६४०, इडब्ल्यूएसमधून १ लाख ५० हजार ६९३, एससीमधून १ लाख १३ हजार ५०९, एसटीमधून ३८ हजार २२० आणि ओबीसीमधून ४ लाख ७४ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. (JEE Mains 2024 Result)

हे ही वाचा :

 

Back to top button