कोणतीही संस्था व तिचे भागधारक आणि ग्राहक यांच्यामध्ये योग्य संवाद निर्माण करून बाजारात कंपनीची चांगली छबी निर्माण करणे याला कॉर्पोरेट जगतात 'कॉर्पोरेट कम्युनिकेशन' म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी कंपन्यांकडून पत्रकांमार्फत हे काम केले जात होते. मात्र, आता यासाठी कम्युनिकेशन प्रोफेशनल्सची नेमणूक केली जाते. तुम्हाला या कामाची आवड असेल, तर 'कॉर्पोरेट कम्युनिकेशन' करिअरसाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल.
कोणत्याही कंपनीचे भागधारकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यात कॉर्पोरेट कम्युनिकेशनची महत्त्वाची भूमिका असते. जागतिकीकरणाच्या जमान्यात आपला व्यवसाय यशस्वी बनविण्यासाठी कॉर्पोरेट कम्युनिकेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये जाहिरात, जनसंपर्क, अंतर्गत संवाद, भागधारकांशी-ग्राहकांशी सुसंवाद, चांगले नाते निर्माण करणे, आपत्ती व्यवस्थापन, ब्रँड व्यवस्थापन या गोष्टी येतात.
कामाचे स्वरूप
कॉर्पोरेट कम्युनिकेटर हा कंपनीचा चेहरा मानला जातो. तो कंपनीला उत्पादन वा सेवांबाबतच्या जनतेमधील मतप्रवाहांची जाणीव करून देतो. तसेच प्रेस रीलिज, इव्हेंट अथवा अन्य कार्यक्रमांचे आयोजन करून माध्यमांद्वारे कंपनीचे कृती कार्यक्रम, ध्येयधोरणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतो. व्यवसायवाढीसाठी कॅम्पेन बनवण्याचीही जबाबदारी कम्युनिकेटरची असते.
कॉर्पोरेट क्षेत्रातील घडामोडींमध्ये कम्युनिकेटरची महत्त्वाची भूमिका असते. व्यवस्थापनाला जो संदेश द्यायचा असतो तो थोडक्यात कम्युनिकेशन विभागाला दिला जातो. या विभागातून तो संदेश विस्तृत आणि प्रभावी शब्दांत स्पष्ट करण्याचे काम केले जाते. कम्युनिकेटर संवादाच्या वेगवेगळ्या पद्धती निर्माण करण्यासाठी आखणी करतो. तसेच अंतर्गत संवादही सशक्त बनवतो. लोकांची मते जाणून घेऊन ग्राहकसेवा चांगल्या पद्धतीने बनविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात.
शैक्षणिक अर्हता
ज्या तरुणांनी पत्रकारिता आणि जनसंवादामध्ये पदवी अथवा डिप्लोमा केला आहे अथवा ज्यांच्याकडे व्यवस्थापनाची पदवी आहे ते या क्षेत्रात येऊ शकतात.
प्राथमिक कौशल्ये
खरे तर कॉर्पोरेट कम्युनिकेटरकडे कोणत्याही पदवीपेक्षा वैयक्तिक कौशल्ये असणे गरजेचे आहे. यामध्ये उत्तम नेटवर्किंगसारख्या प्राथमिक कौशल्याबरोबरच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन चांगले असेल, तर कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या क्षेत्रात यशस्वी होणे सोपे असते.
भरपूर संधी
भारतात सध्या कंपन्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. स्पर्धा वाढत आहे. प्रत्येक कंपनीकडून ब्रँडिंगवर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. याचबरोबर भारतीय बाजारात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येत आहेत. त्यांना व्यवसायवाढीसाठी कॉर्पोरेट कम्युनिकेटरची गरज भासणार आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. पगाराच्या द़ृष्टिकोनातून पाहिल्यास, फ्रेशर्स व्यक्तींना सुुरुवातीला 25 हजार रुपये वेतन मिळू शकते. उमेदवाराने आपल्या कौशल्याने कंपनीचे ब्रँडिंग उत्तम प्रकारे केले, तर पुढे वेतनात भरघोस वाढ होऊ शकते.
प्रत्येक क्षेत्रात मागणी
कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे उदयोन्मुख क्षेत्र आहे. यात माध्यम संपर्क, जनसंपर्क, आपत्ती आणि अंतर्गत संवाद अशा अनेक जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. डिजिटल जगामध्ये होत असलेल्या वाढीमुळे कॉर्पोरेट कम्युनिकेटर्सची मागणी वाढत आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रभावी संवादकला हे तुमचे बलस्थान असेल आणि तुम्हाला विविध व्यवसायांचे, प्रसिद्धी क्षेत्राचे ज्ञान असेल तर या क्षेत्रात तुम्ही चमकदार कामगिरी करू शकता.