Abhishek Ghosalkar Firing Case : घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसचा बॉडीगार्ड अटकेत | पुढारी

Abhishek Ghosalkar Firing Case : घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसचा बॉडीगार्ड अटकेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपी मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक असून त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यातील पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. (Abhishek Ghosalkar Firing Case)

एमएचबी पोलिसांनी दहिसरमधील किराणा व्यावसायिक श्रीलालचंद पाल (वय 58) यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आरोपी मॉरिस नोरोन्हा याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हे त्याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याचे असल्याने या गुन्ह्यात शस्त्र कायद्याच्या 29 (ब), 30 या कलमांची वाढ करून मिश्रा याला अटक करण्यात आल्याचे उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अन्य दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारेख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावे आहेत. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे फेसबुकवर लाईव्ह होते, त्यावेळी मेहुल पारेख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याची चर्चा आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मेहुल पारेख हा आरोपी मॉरिस नोरोन्हाचा पी.ए. होता. अभिषेक घोसाळकर यांच्यावर ज्या पिस्तुलातून मॉरिस याने गोळीबार केला ते पिस्तूल मिश्रा नावाच्या खासगी सुरक्षा रक्षकाचे असल्याची माहितीही समोर आली आहे. (Abhishek Ghosalkar Firing Case)

मॉरिसच्या पत्नीची चौकशी

अभिषेक घोसाळकर यांचा मारेकरी मॉरिसच्या पत्नीचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मॉरिसच्या मनात घोसाळकरांविरोधात तीव्र संताप होता. मी त्याला संपवणार, असे तो सतत म्हणत असायचा, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. (Abhishek Ghosalkar Firing Case)

हेही वाचा :

 

Back to top button