Shiv Sena MLA Anil Babar | ”जवळचा सहकारी, प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला”, मुख्यमंत्री शिंदेंनी अनिल बाबर यांना वाहिली श्रद्धांजली | पुढारी

Shiv Sena MLA Anil Babar | ''जवळचा सहकारी, प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला'', मुख्यमंत्री शिंदेंनी अनिल बाबर यांना वाहिली श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खानापूर मतदारसंघांचे आमदार अनिल बाबर (Shiv Sena MLA Anil Babar) यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. बाबर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ”आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे”, अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी X वर पोस्ट केली आहे.

आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आ. बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी, सिंचनासाठी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी तसेच टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

अनिल बाबर १९९० ते १९९५, १९९९ ते २००४ आणि २०१४ ते २०२४ असे चार वेळा आमदार राहिलेत. अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा राहिला आहे. त्यांनी खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते. त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती. बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

 हे ही वाचा :

 

Back to top button