पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणार्या जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.16) दहाजणांच्या शिष्टमंडळासमवेत दावोसला रवाना झाले. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे 3 लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.
दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत ही जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum) होतआहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, असे दहाजणांचे शिष्टमंडळ रवाना झाले. एमएमआरडीए व महाप्रीत येथील 8 अधिकारी स्वतंत्ररीत्या सहभागी होत असून, या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौर्यात खासगी विमानाचा वापर होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून, गेल्यावर्षी या परिषदेत 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन उभारण्यात आले असून, या ठिकाणी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या करण्यात येतील. तसेच मुख्यमंत्री तेथे नामवंत विदेशी उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत, तसेच महाराष्ट्राच्या घोडदौडीविषयी माहिती देणारे द़ृकश्राव्य प्रदर्शनही तेथे असेल.
सुमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. पोलाद, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजन, हिरे व आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषि- औद्योगिक, कृषि आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यानुसार २० सामंजस्य करार केले जातील. यामध्ये निपॉन आर सेलर मित्तल, इंडिया ज्वेलरी पार्क, कंट्रोल एस, आयनॉक्स, ए बी ब्रिव्हरी, जिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग राज्यात केवळ मुंबई, पुणे भागात न येता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड अशा सर्वदूर ठिकाणी येतील.
हेही वाचा :