Devendra Fadnavis : कारसेवक बाबरीचा ढाचा पाडत होते, तेव्हा तुम्ही निसर्गाचे फोटो काढत होता : फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis : कारसेवक बाबरीचा ढाचा पाडत होते, तेव्हा तुम्ही निसर्गाचे फोटो काढत होता : फडणवीस

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : आम्ही कारसेवक म्हणून कार- सेवा केली आणि बाबरीचे पतन झाले तेव्हा उद्धव ठाकरे काय करत होते, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना राम समजला नाही, त्यांनी रामायणाचे दाखले आम्हाला देऊ नये, असा हल्ला उद्धव ठाकरेंवर चढवला. ठाण्याचे काही महाभाग राम काय खात होता, यावर बोलतात. मात्र ते शेण खातात हे आम्हाला दिसले, अशा तिखट शब्दांत फडणवीस यांनी आव्हाडांवर हल्ला चढवला. (Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis : …तेव्हा तुम्ही निसर्गाचे फोटो काढत होता

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कार- सेवकांचा सत्कार रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. आनंदनगर येथील ठाणे महापालिकेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात फडवणीस यांच्या हस्ते कारसेवक मारुती शेळके, अंजली शेळके, प्रमोद घोलप, मोहन नाणे, अनिरुध्द साठ्ये, सुजित साठ्ये, डॉ. अंजली गांगल यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आम्हाला प्रभू रामाची सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा आम्ही कारसेवेला गेलो, पण तेव्हा तुम्ही कुठे होतात, तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते, लाठ्या झेलत मंदिर वही बनायेंगे असे कार सेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही कुठल्यातरी जंगलामध्ये वाघाचे फोटो काढत होतात, असा टोला फडवणीस यांनी शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना लगावला, तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार ? असा सवालही फडणवीस यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव वाघ होते, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

मंथरेचे ऐकले की काय होते, हे आता कळले असेल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात खासदार संजय राऊत यांचा उल्लेख मंथरा असा केला. रामायणात मंथरेचे ऐकल्यावर काय झाले, तेच मंथरेचे ऐकून तुमचे झाले आहे, मात्र रामायणात पुण्यवान राजा दशरथ होते. इथं तुमचं काय होईल, सांगता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button