

मुंबई : पुढारी वृत्तसेवा" image="http://"][/author]
मुंबईच्या नौदल गोदीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. अत्याधुनिक शस्त्रे आणि आधुनिक टेहळणी रडारसह सेन्सर्स असलेली स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रनाशक विनाशिका म्हणून आयएनएस विशाखापट्टणमची ओळख आहे. ही विनाशिका भारताच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक बनेल, असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात विशाखापट्टणम या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधणी केलेल्या पहिल्या विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, आयएनएस विशाखापट्टणम सागरी सुरक्षा बळकट करेल आणि राष्ट्रहिताचे संरक्षण करेल. 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीमुळे भारत लवकरच जागतिक जहाज बांधणी केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नौकानयन स्वातंत्र्य आणि सागरी मार्गांची सुरक्षा आवश्यक आहे. ही विनाशिका प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सागरी सामर्थ्याचे, जहाज बांधणी कौशल्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारी आहे. सशस्त्र दल आणि संपूर्ण देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करू शकणारी जगातील सर्वात तांत्रिकद़ृष्ट्या अत्याधुनिक गायडेड क्षेपणास्त्र युद्धनौकांपैकी ही एक युद्धनौका आहे, अशा शब्दांत त्यांनी या विनाशिकेचे वर्णन केले
.
जागतिक सुरक्षेसंदर्भात उद्भवलेली कारणे, सीमावाद आणि सागरी वर्चस्व यांनी देशांना त्यांचे संरक्षण सामर्थ्य बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राने सरकारच्या धोरणांचा लाभ घेऊन, एकत्रितपणे काम करून देशाला स्वदेशी जहाज बांधणीचे केंद्र बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकारने केलेल्या अनेक सुधारणांची यादी सादर करत सिंह यांनी या सुधारणांद्वारे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवू शकतात, असे म्हणाले.
नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, खासदार अरविंद सावंत, ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अॅडमिरल नारायण प्रसाद (निवृत्त) आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी आयएनएस विशाखापट्टणम विनाशिका नौदलात समावेश करण्याच्या समारंभाला उपस्थित होते.