Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष- मुख्यमंत्री भेटीवर आक्षेप | पुढारी

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष- मुख्यमंत्री भेटीवर आक्षेप

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोपी आहेत. आम्ही त्यांच्यावर अपात्रतेचा खटला दाखल केलेला आहे. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती आरोपीच्या घरी जाऊन भेटत असतील, तर त्यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra Politics)

ज्या पद्धतीने या केसची हाताळणी सुरू आहे, त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी शंका उपस्थित करत आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल म्हणजे आपल्या देशातली लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा असेल, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल बुधवारी (दि. 10) दिला जाणार आहे. तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत निकालाबात तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लवादाचे अध्यक्ष दोनवेळेला उघडपणे मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन भेटले. अध्यक्ष ज्या भूमिकेत आहेत याचा अर्थ असा की, न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटले आहेत. कारण, शिंदे यांच्यावर आम्ही अपात्रतेचा खटला दाखल केला आहे. अशा स्थितीत आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी? आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडून आहेच; शिवाय आम्ही ही परिस्थिती लोकांच्याही निदर्शनास आणू इच्छितो.

जुलमी राजवटीचा अंत जनता करणार

बिल्किस बानो प्रकरणावरून ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला. हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही. जुलमी अत्याचार करणार्‍यांचा अंत हा केलाच पाहिजे, ही शिकवण देणार्‍या रामाचे मंदिर उभे राहत आहे. त्यामुळे या जुलमी राजवटीचा अंत जनता करेलच, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच. ही माझी लढाई नाही, जनतेच्या भवितव्याची लढाई आहे. रामाची शिकवण घेऊन अत्याचाराचा आणि जुलूमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (Maharashtra Politics)

Back to top button