अशा प्रकारे वयाचा हिशोब…; शरद पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर | पुढारी

अशा प्रकारे वयाचा हिशोब...; शरद पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ‘वय ८४ झाले तरी काहीजण थांबायला तयार नाहीत’ अशा शब्दात रविवारी जोरदार टीका केली होती. यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. “त्यांनी काय बोलायचं याच्यासंबंधी मी फारस बोलू इच्छीत नाही. अशा प्रकारे वयाचा हिशोब करणं त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात. अशा गोष्टींबद्दल बोलणं मला आवश्यक वाटतं नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) ठाणे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अशा प्रकारे वयाचा हिशोब करणं योग्य नाही. माझ्या बाबतीत विचार करायचा झाला तर, मी कधी राज्याच्या विधीमंडळात तर कधी देशाच्या संसदेत अविरत काम करत आहे. या काळात कधीही माझ्या सक्षमतेबद्दल किंवा काम करण्याच्या पद्धतीबद्दल विरोधकांनी हा विषय काढला नाही. वयाचा प्रश्न असेल तर अनेक लोकांबद्दल सांगता येईल. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल बोलणं मला आवश्यक वाटत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेचा १२ तासात निकाल येईल त्यानंतर चर्चा करू. मात्र नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर संशयाला जागा आहे. राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यावर बोलताना, दिल्लीतील सरकार बदलत नाही तोवर धाडसत्र सुरूच राहतील, असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी केले पंतप्रधानांचे समर्थन

मालदीवच्या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि इतर कोणत्याही देशातून कोणीही आपल्या पंतप्रधानांवर अशी टिप्पणी केली तर ते आम्ही स्वीकारणार नाही. आपण पंतप्रधान पदाचा आदर केला पाहिजे. पंतप्रधानांच्या विरोधात देशाबाहेरील कोणाचे काहीही आम्ही स्वीकारणार नाही,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे.

‘बिल्किस बानो प्रकरण महाराष्ट्र सरकाने गांभीर्याने घ्यावं’

बिल्कीस बानो प्रकरणी निर्णय देताना राजकीय हस्तक्षेप होऊ देवू नये. आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षा माफ करण्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा गांभीर्याने विचार करणे गरजेच आहे. बिल्कीस बानोला न्याय मिळावा, असा निर्णय सरकारने घ्यावा. सामन्य माणसाला आधार मिळण्यासारखा कोर्टाने हा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

राजकारणात वय झाले की आपण थांबायचे असते. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. ८४ वय झाले तरी काहीजण थांबायला तयार नाहीत. किती हा हट्टीपणा… अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष (अजित पवार गट) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी हल्लाबोल केला होता. काही नेते वय झाले तरी थांबायला तयार नाहीत, अशा शब्दांत शरद पवार यांच्यावर टीका करून ते म्हणाले, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपसोबत गेलो. आम्हीही पाच वेळा उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीची सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा : 

Back to top button