Weather Forecast | राज्यात पुन्हा अवकाळी! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता | पुढारी

Weather Forecast | राज्यात पुन्हा अवकाळी! 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतात थंडीची लाट असून, अद्याप राज्यात थंडी कमीच आहे. दरम्यान, आज (दि.८) आणि उद्या (दि.९) राज्यातील उत्तरेकडील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील पोस्ट पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी X अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विट) शेअर केली आहे.

डॉ. होसाळीकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज ८ जानेवारी रोजी धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. दरम्यान, विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. तर ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी (दि.९) देखील धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या उत्तरेकडील जिल्ह्यांनादेखील हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिला आहे.

पश्चिमी चक्रवातामुळे तापमानात घट

उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवाताचा परिणाम राज्यावर दिसत असून सोमवारी व मंगळवारी उत्तर आणि मध्य महाराष्ट्राला जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे किमान तापमान 4 ते 8 अंशांवर आले आहे. आगामी तीन दिवस पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात थंडीची लाट अतितीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. त्यातही प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात 8 व 9 जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागात प्रामुख्याने सोमवार व मंगळवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button