मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील अंतिम युक्तिवादाला आता सुरूवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील या युक्तिवादासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हजर झाले आहेत. आजपासून पुढील तीन दिवस हा युक्तिवाद रंगणार आहे. सुरूवातीला ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि त्यानंतर शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी युक्तीवाद करतील. त्यासाठी दोन्ही गटांना साधारण दीड दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे.
हिवाळी अधिवेशना दरम्यान घेतलेल्या सुनावणीत, १२ डिसेंबरला शिंदे गटाच्या पाच नेत्यांची साक्ष नोंदणी आणि उलटतपासणी झाली. दोन्ही गटांनी आतापर्यंत सादर केलेली कागदपत्रे, पुरावे, साक्षी आणि उलटतपासणीच्या आधारावर आता पुढील तीन दिवस युक्तिवाद केला जाणार आहे. शिंदे गटाने पक्षाचा अधिकृत व्हिप डावलून पक्षविरोधी कारवाई केली, त्यांचा सुरत-गुवाहाटी दौरा म्हणजे पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा प्रकार होता यावर ठाकरे गटाचा भर असण्याची शक्यता आहे. तसेच, पक्षाच्या घटनेबाबत शिंदे गटाच्या नेत्यांचे दाव्यांवरही युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना असल्याच्या दाव्याभोवती तर्क दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावरील बैठक अनधिकृत होती इथपासून उद्धव ठाकरे यांची घटनेनुसार पक्षप्रमुख पदी निवड झालीच नव्हती हा मुद्दाही पुढे केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २० डिसेंबरपर्यंत अंतिम युक्तीवादाचे कामकाज संपवून निर्णय राखून ठेवला जाईल. विधानसभा अध्यक्षांच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी १० जानेवारीपर्यंतचा वेळ वाढवून दिला आहे. हा वाढीव वेळ पुरेसा असल्याचे सांगत दहा तारखेपर्यंत निकाल देणार असल्याचे नार्वेकरांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील वीस दिवसात आमदार अपात्रतेचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :