पुढारी ऑनलाईन डेस्क: सरकारच्या वतीने अनेक मंत्री आणि नेत्यांनी मराठा आंदोलना दरम्यान भेट दिली. यावेळी सरकारने लेखी आश्वासन दिले. पण पुढे काय झाले हे आम्हाला माहित नाही. यावरून सरकार मराठ्यांची फसवणूक करतय की काय? असा प्रश्न आम्हा मराठ्यांना पडत आहे. त्यामुळे आरक्षणावर काय कार्यवाही केली? असा सवाल मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला केला आहे. संभाजीनगर येथील रूग्णालयातून आज (दि.१५) ते माध्यमांशी बोलत होते. (Maratha Reservation)
पुढे जरांगे- पाटील म्हणाले, सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केली नाहीत. सरकारने लेखी आश्वासनावर काय कार्यवाही केली ते सांगावे. हे स्पष्ट न केल्यास, कोणत्याही नेत्याचा शब्द पाळला जाणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे- पाटील यांनी दिला आहे. तसेच सरकार मराठ्यांना न्याय देईल यावर आमचा अजूनही विश्वास आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation)
आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. रविवारी २४ डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या. एकदा आंदोलनाचा निर्णय झाला की सरकारचा आणि आमचा विषय संपला. पण रविवारी १७ डिसेंबर पर्यंत सरकारने उत्तर न दिल्यास आमच्याकडील फोटो व्हिडिओ माध्यमांसमोर आणू असा इशारा देखील जरांगे-पाटील यांनी राज्यातील सरकारला दिला आहे.
रविवार, १७ डिसेंबर राेजी बैठकीनंतरच मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणप्रश्नावर अंतिम भूमिका ठरवण्यासाठी १७ तारखेला सकाळी ९ वाजता बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला समाजातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. मराठा प्रश्नाचे आंदोलनाची व्याप्ती वाढेल ; पण हे आंदाेलन शांततेच्या मार्गाने होणार आहे, असेही जरांगे -पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil)