

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कुर्ला टर्मिनस येथील जनआहार कॅन्टीनला आग लागण्याची घटना आज (दि.१३) दुपारी ३ च्या दरम्यान घडली. आग लागताच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुर्ला टर्मिनस येथील तिकीट बुकिंग ऑफिसच्या पोटमळ्यावर जनआहार कॅन्टीन असून त्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहेत. याच कॅन्टीनला आग लागण्याची घटना दुपारी ३ वाजता घडली. आग लागताच बुकिंग ऑफिस मधील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. कॅन्टीनसह बुकिंग ऑफिसला देखील आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण कँटीन, आरामगृह आणि तिकीट केंद्राचा भाग जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कँटिन परिसरात सुरू असलेल्या पॉड हॉटेलच्या निर्माण कार्यातून ही आग लागली आणि संपूर्ण कँटीनमध्ये पसरली. यावेळी कँटिन, आरामगृह आणि तिकीट घर आणि खाली हॉलमध्ये असलेल्या व्यक्तीबाहेर पळाल्या. या स्थानकाच्या आजूबाजूला काचांचे बांधकाम असल्याने अग्निशमन दलाला या काचा फोडून आत जावे लागले. पोट माळ्यावर असलेल्या जन आहार कँटीनमध्ये आग पसरली. आणि खाली असलेल्या आरक्षण केंद्र आणि आरामगृहात आग पसरली. सुमारे एक तासाने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागली तेव्हा कँटीनमधील सिलिंडर कामगारांनी बाहेर फेकल्याने त्याचे स्फोट झाले नाहीत.
दुपार नंतर लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर सर्वात जास्त वापरले जाणारे एक क्रमांकाचे फलाट बंद करण्यात आले. तसेच वीज प्रवाह बंद करण्यात आल्याने प्रवाश्यांना तिकीट ही मिळत नव्हते. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे विभागीय संचालक रजनीश गोयल घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी एक पॉड होटल निर्मितीचे काम सुरू होते. या ठिकाणी प्रथम आग लागली असावी अशी शक्यता असल्याचे गोयल म्हणाले. गाड्यांना उशीर झाला असला तरी लवकरात लवकर त्या सुरळीत होतील, वीजप्रवाह सुरू करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. लोहमार्ग पोलीस, मुंबई पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी तैनात होते.
या आगीचे ठोस कारण समोर आलेले नसले तरी येथे सुरु असलेल्या निर्माण कार्यातून ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा