मुंबई महापालिका निवडणुक : मुंबईत सेनेला हवाय काँग्रेसचा हात | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुक : मुंबईत सेनेला हवाय काँग्रेसचा हात

मुंबई ; नरेश कदम : मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून मुंबई महापालिकेची निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी करण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने स्वबळाचा नारा दिला असला तरी शिवसेनेचे नेते आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसचा हात कशासाठी?

मुंबईची सत्ता राखण्यासाठी केवळ मराठी मते पुरेशी नाहीत. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे गाठीशी असलेली काही मराठी मतेही शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता आहे. सत्तेसाठी गुजराती, जैन, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांचीही गरज असून, त्यासाठीच सेनेला आता काँग्रेसलाही सोबत घ्यायचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सेनेसोबत आघाडी करण्याची तयारी जाहीर केली आहे. डझनभर नगरसेवकांच्या पलीकडे राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाही. ती वाढवण्यासाठी राष्ट्रवादीला सेनेची साथ हवी आहे आणि अमराठी मतांचा टक्का खेचण्यासाठी सेनेला काँग्रेसचा हात लागेल. काँग्रेसकडे मुस्लिम, दलित तसेच अन्य मतदार आहेत. त्यामुळे या वोटबँकेवर शिवसेनेची नजर आहे.

उद्धव-सोनिया चर्चा होणार

शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी अंतर्गत सर्व्हे केले असून, केवळ मराठी मतांवर महापालिका जिंकता येणार नाही, असा अंदाज त्यातून आला आहे. त्यामुळेच आघाडी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसला देण्याचे शिवसेनेने ठरवल्याचे समजते. आधी मुंबई काँग्रेसच्या पातळीवर शिवसेनेशी चर्चा होईल. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने ऐकले नाही तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

समीकरणे बदलली

गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे असली तरी आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती म्हणून निवडणुकीला सामोरे जात होती. 2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप हे राज्याच्या सत्तेत एकत्र होते मात्र, महापालिका ते स्वतंत्र लढले.

मागच्या निवडणुकीत भाजपने 82 नगरसेवक निवडून आणले आणि शिवसेना 84 वर राहिली. तुल्यबळ संख्या जिंकूनही महापालिकेत पहारेकरी म्हणून बसायचे ठरवत भाजपने एक प्रकारे शिवसेनेचा सत्तामार्ग सुकर केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र शिवसेनेने भाजपची साथ सोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी तगडी लढत होऊ घातली आहे.

आपापले बालेकिल्ले

मुंबईतील काँगे्रसचे बालेकिल्ले असलेले वॉर्ड काँग्रेसला दिले जातील त्याचबरोबर काही अमराठी मतदारांचे प्राबल्य असलेले वॉर्ड देखील काँग्रेसला देण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांचे म्हणणे आहे.

अमराठी मतांसाठी

शिवसेना आणि काँग्रेस वेगळी लढली तरी शिवसेनेलाच जास्त फटका बसेल. राज ठाकरे यांची मनसे ही मराठीबहुल वॉर्डांमध्ये शिवसेनेला फटका देईल. त्यामुळे जमेला असलेली मराठी मते आणि आघाडी सरकारमुळे अनुकूल झालेली अमराठी मते खेचण्यासाठी काँग्रेसला सोबत घेऊन महापालिकेत आघाडी करण्याचा प्रयोग शिवसेना करणार आहे.

Back to top button