Transport : ईस्टर्न फ्री-वेचा होणार ठाण्यापर्यंत विस्तार | पुढारी

Transport : ईस्टर्न फ्री-वेचा होणार ठाण्यापर्यंत विस्तार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई ते ठाणे म्हणजे एका अर्थाने मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक येत्या काळात अधिक जलद गतीने होणार असून त्यासाठी इस्टर्न फ्री वेचा (Transport) ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा महत्वाचा निर्णय मंगळवारी एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

फ्री वेचा ठाण्यापर्यंत विस्तार होणार असून हाच एलिव्हेटेड रस्ता पुढे साकेत ते खारेगावपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गायमुख ते मुंबईपर्यंत विना कोंडी वाहतुकीचा मार्ग खुला होईल. त्याचप्रमाणे, कोपरी-पटणी खाडी पूल आणि खारेगाव बायपासमुळे कळवा, विटावा, खारेगाव येथील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

सध्या इस्टर्न फ्री वे शिवाजी नगर येथे समाप्त होतो. मात्र, त्यानंतर ठाण्यापर्यंत येताना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे  ठाण्यापर्यंत फ्रीवेचा विस्तार करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले होते. या विस्तारामुळे  ठाणे शहरातील मुख्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या १५१ व्या बैठकीत हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कोपरी-पटणी खाडी पूल आणि खारेगाव बायपास या प्रकल्पांनाही तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून त्यांची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

ठाणे आणि एमएमआर प्रदेशाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली असून वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्यकता असून गेली अनेक वर्षे मागणी होत असलेल्या साकेत-गायमुख बायपास रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या बायपासमुळे घोडबंदर मार्गे होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळेल,असे  शिंदे यांनी म्हणाले.

पश्चिम द्रुतगती महामार्गाचे काँक्रीटीकरण

वाहतूककोंडीने त्रस्त असणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Transport) कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून काही भागात काँक्रीटीकरण करण्याचाही प्रस्ताव होता. या प्रस्तावासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Back to top button