धुळे-मुंबई एक्सप्रेस रेल्वे नियमित धावणार, रेल्वे विभागाकडून अधिसूचना जारी | पुढारी

धुळे-मुंबई एक्सप्रेस रेल्वे नियमित धावणार, रेल्वे विभागाकडून अधिसूचना जारी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अर्थात मुंबई ते धुळे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे आता नियमित करीत दररोज धावणार असल्याची अधिसुचना रेल्वे विभागाने जारी केली आहे. धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरु करुन ती रोज धावेल हे धुळेकरांना दिलेले वचन पुर्ण झाले अशी प्रतिक्रिया खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.

धुळे ते दादर प्रवासासाठी पुर्वी दोन बोगी रोज सायंकाळी धुळ्यातून चाळीसगांवपर्यंत जात होती. तेथून दादर अमृतसर एक्सप्रेसला त्या बोगी जोडून मुंबईपर्यंत रेल्वे प्रवासाची सुविधा होती. मात्र कोरोना काळात ती सेवा बंद झाली. त्यानंतर पुन्हा रेल्वे सुरु करावी, अशी मागणी होत असतांनाच खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी स्वतंत्र रेल्वे धुळ्याहून मुंबईसाठी सुरु करावी अशी मागणी करीत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे धुळे-दादर एक्सप्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते धुळ्यातून रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सदर रेल्वेसेवा नियमित करण्याची मागणी केली होती. आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा रेल्वेमंत्रालयाकडे सुरु ठेवला होता.

त्या पाठपुराव्याला तसेच धुळेकर रेल्वे प्रवाशांनी धुळे दादर एक्सप्रेसला दिलेला अभुतपुर्व प्रतिसाद यामुळे अखेर रेल्वे मंत्रालयाने धुळे ते मुंबई एक्सप्रेस रेल्वे नियमित करण्याचा निर्णय घेत तशी अधिसुचना जारी केली आहे. गाडी क्र.11011 डाऊन,मुंबई – धुळे ही रेल्वे मुंबई हुन दुपारी 12 वाजता सुटेल व धुळयाला संध्याकाळी 8:50 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्र.11012 अप,धुळे – मुंबई रेल्वे धुळयाहुन सकाळी 6:30 वाजता सुटेल. व मुंबई ला दुपारी 2:15 वाजता पोहोचेल. धुळेकरांना दिलेला शब्द पुर्ण केल्याचे समाधान असून रेल्वेला प्रतिसाद देवून यशस्वी करावे. असे आवाहन खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button