NCB investigation : एनसीबीने आर्यन खान याचा जबाब नोंदवला | पुढारी

NCB investigation : एनसीबीने आर्यन खान याचा जबाब नोंदवला

मुंबई, पुढारी ऑनलाईन

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) ( NCB investigation ) दिल्लीतील विशेष पथकाने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याचा नवी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जबाब नोंद केला आहे. याप्रकरणात एनसीबीच्या विशेष पथकाने एकूण 15 जणांकडे चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदविले असून मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या काही सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.

एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या 25 कोटींच्या खंडणी वसूलीच्या गंभीर आरोपानंतर एनसीबीने खर्या अर्थाने पाच सदस्यीय समीतीच्या आधारे तपास सुरु करत मुंबई एनसीबीकडील सहा प्रकरणांचा तपास दिल्लीतील पथकाकडे सोपविला आहे. त्यानुसार एनसीबीची ही विशेष पथके मुंबईत येऊन तपास करत आहेत. या पथकांनी आर्यन खान याचा नवी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जबाब नोंदविण्यात आला आहे. तर, शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हीची अद्याप चौकशी झालेली नसल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली.

पंच प्रभाकर साईल याच्याकडे एनसीबीच्या दिल्लीतील विशेष पथकाने सलग दोन दिवस कसून चौकशी करत त्याचा जबाब नोंदविला आहे. प्रभाकर साईल याने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे संबंधीतांना समन्स बजावून त्यांचे जबाब नोंदवत विशेष पथकाचा तपास सुरु आहे. गरज भासल्यास एनसीबी प्रभाकर साईल याच्याकडे पून्हा चौकशी करण्याची शक्यता आहे. तर, पंच किरण गोसावी याच्या चौकशीसाठी एनसीबीने न्यायालयात अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. गोसावी हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याचा ताबा मागणार असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.

एनसीबीच्या अधिकार्यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही एनसीबीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही यंत्रणा देशातून ड्रग्जचे उच्चाटन करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी काही सीसीटिव्ही फुटेज एनसीबीला दिले असून त्याआधारेही एनसीबी झालेल्या आरोपांची पडताळणी करुन पूढील तपास करत आहे.

एनसीबीची पथके रात्री उशीरापर्यंत तपास करत आहेत. या सर्वांचे जबाब लेखी आणि व्हीडीओच्या माध्यमातून नोंद करण्यात येत आहेत. एनसीबीने या तपासात काही कागदपत्रे, इलेक्ट्राँनिक पुरावे घेतलेले आहेत. त्याआधारे तपास सुरु असून एनसीबीचे पथक पून्हा दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. प्रभाकर साईल हा जबाब देण्यासाठी समोर आल्याने तपासाला गती मिळाली आहे. मात्र किरण गोसावी याच्याकडे चौकशी करे पर्यंत याप्रकरणात आणखी कोण-कोण सामील आहेत. कोणाचा संबंध कोणाशी आहे हे समजू शकणार नसल्याचे एसीबीच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.

Back to top button