त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद; मुस्लीम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण | पुढारी

त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद; मुस्लीम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण

नांदेड : पुढारी वृत्तसेवा

त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद उमटले. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने शुक्रवारी बंद पाळला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी देगलूर नाका येथे जिल्ह्यातील मुस्लीम बांधव एकत्र जमले होते. परतीच्या वेळी काही समाजकंटकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत एक दगड पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. तसेच शिघ्र गती दलाच्या एका जवानाच्या पायाच्या नसा तुटल्या तर दुसर्‍या एका जवानाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

पोलिसांच्या मोबाईल व्हॅनलाही समाजकंटकांनी लक्ष्य केले. परिस्थिती आटोक्यात आण्यासाठी पोलिसाना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तरीही जमाव पांगत नसल्याने प्लास्टिक बुलेट फायर करण्यात आल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री उशिरापर्यंत धरपकड करत पोलिसांनी सुमारे १५ जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया इतवारा पोलिस ठाण्यात सुरु होती. नरवाडे यांच्या पायातून रक्त सांडत असतांनाही ते जखमेवर रुमाल बांधून अखेरपर्यंत घटनास्थळावरुन हलले नाहीत.

त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद : दुकाने गाड्यांना केले टार्गेट

दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास फुले मार्केट आणि शिवाजी नगर येथे काहींनी दगडफेक करण्यास सुरुवात केली, यावेळी येथील एका मिठाईच्या दुकानात जाऊन तोडफोड करण्यात आली. तर दुकानाबाहेरील भट्टीची नासधुस करुन कढईतील तेल रस्त्यावर फेकून देण्यात आले. चार दुचाकीवर आलेल्या दहा ते बारा जणांनी दगडफेक करुन दोन वाहनांच्या काचा फोडल्या. ओळख लपविण्यासाठी समाजकंटकांनी तोंडावर धोटा बांधला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळानंतर बाजारपेठ पुर्ववत होत असतांनाच देगलूर नाका आणि बर्की चौकात दगडफेक सुरु झाली.

त्रिपुरा दंगलीचे नांदेडात पडसाद : मोर्चा परतत असतानाच दगडफेक

देगलूर नाका येथे घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हाभरातून मुस्लीम बांधव जमले होते. निषेधानंतर परत जाण्याच्या वेळी अचानक दगडफेक सुरु झाली. जमावाने दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिसांची मोबाईल व्हॅन आणि काही खाजगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. येथील एका देशी दारुच्या दुकानातील दारुचे बॉक्स रस्त्यावर टाकून जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे आणि दोन जवान जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने पोलिसांना प्लास्टिक बुलेट फायर कराव्या लागल्या, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत पंधरा समाजकंटकांना ताब्यात घेतले असुन आणखी शोध मोहीम सुरु होती.

विशेष पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलिस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उप अधिक्षक सिद्धेश्‍वर भोरे, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, अशोक घोरबांड यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर होता.

Back to top button