Manoj Jarange- Patil : ओबीसी आरक्षणाचा इतका टक्का वाढला कसा ? : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

Manoj Jarange- Patil : ओबीसी आरक्षणाचा इतका टक्का वाढला कसा ? : मनोज जरांगे-पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी समाजाला आरक्षण देताना कोणता आधार घेतला ? ओबीसी आरक्षणाचा इतका टक्का वाढला कसा ? असा सवाल करून मंडल आयोगात कोणतीच जात मागास म्हणून सिद्ध झालेली नाही. सगळे निकष पार करूनही मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, मराठ्यांना इतके नियम कसे काय लावले ? असा सवाल करून आरक्षण नसल्याने मराठा समाजाच्या लेकरांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. त्यामुळे मतभेद सोडून मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२१) केले. सोलापुरातील अकलुज येथे ते जाहीर सभेत बोलत होते. (Manoj Jarange- Patil)

मनोज जरांगे- पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततेत मराठा बांधवांचा लढा सुरू झाला आहे. त्याला कुठेही गालबोट लावू नका. मराठे आडमुठे असल्याची वारंवार टीका होत आहे. आंदोलन दडपण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आपण आरक्षण समजून घ्यायला उशीर केला, म्हणून आपण मागे पडलो आहे. आरक्षण नसल्याने मराठा समाजाच्या लेकरांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. उच्च शिक्षण व नोकरीत मराठा समाज वंचित राहत आहे. त्यामुळे आता मतभेद सोडून मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, मराठा बांधवांवर झालेल्या अन्यायाची जाणीव ठेवा. आपल्या जातीवर अन्याय झाला म्हणून आपण एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.

मराठा समाजासाठी दिलेले बलिदान विसरून चालणार नाही. अकलुजमध्ये येऊन मराठ्यांची ताकद बघा, असे आव्हान त्यांनी सरकारला दिला. मराठ्यांचा हा लढा थांबणार नाही, ऊन – पावसाला आम्ही घाबरत नाही. उन्हातान्हात राबणारी आमची जात आहे. सरकारला आपण ४ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. सरकारने आपल्याकडे वेळ मागून घेतला आहे. कुणबी प्रमाणपत्र द्यायला हरकत काय ? असा सवाल करून गोरगरिबांचे भविष्य घडू द्या, आता काहीही झाले तरी आरक्षण घेऊनच राहणार, असा निर्धार व्यक्त करून मरेपर्यंत समाजासोबत गद्दारी करणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी मराठा समाजाला दिले. यावेळी मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हेही वाचा 

Back to top button