Mumbai Air Pollution : मुंबईचा श्वास गुदमरतोय! हवा प्रदूषणात झपाट्याने वाढ | पुढारी

Mumbai Air Pollution : मुंबईचा श्वास गुदमरतोय! हवा प्रदूषणात झपाट्याने वाढ

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचा कहर पाहायला मिळत असून शुक्रवारी अंधेरी पूर्वेतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा ४२८ वर पोहोचला. हवेची ही स्थिती आरोग्यासाठी प्रचंड घातक आहे. काल शहरातील एकूण एक्यूआय हा १६९ इतका होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी, पूर्व भागासह माझगाव (२७६) आणि मालाडमध्येही (२१२) अतिखराब हवेची नोंद झाली. सायन आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक्यूआयने दोनशेचा टप्पा पार केला. (Mumbai Air Pollution)

Mumbai Air Pollution : अंधेरी पूर्वेतील एक्यूआय ४२८ वर!

मुंबईतील सरासरी एक्यूआयचा विचार करता गुरुवारी आणि शुक्रवारी अनुक्रमे १५६ आणि १५९ एक्यूआयची नोंद झाली. हे हवेचे हे खालावलेले प्रमाण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. शनिवार आणि रविवारी एक्यूआयचे प्रमाण अनुक्रमे १४१ आणि १२९ असे असेल. काही सेन्सिटिव्ह घटकांसाठी हे प्रमाण घातक असेल. बुधवारी ऑक्टोबरमधील गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्याच्या एक दिवस आधी, मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १९१ वर पोहोचला. डिसेंबर-जानेवारी २०२२-२३ मध्ये खराब हवेच्या गुणवत्तेच्या दिवसांची संख्या २०१९- २० मधील त्या दोन महिन्यांच्या कालावधीत १७ वरून जवळजवळ दुप्पट झाली. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्ट अँड रिसर्चच्या (सफर) डेटानुसार, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबईमध्ये गेल्या हिवाळ्यात सर्वात वाईट एक्यूआयची नोंद झाली. मागील तीन वर्षांतील त्या महिन्यांतील सरासरी २८ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ कालावधीत ९२ पैकी ६६ दिवसांमध्ये खराब आणि अतिशय खराब हवा अनुभवायला मिळाली. सफरच्या माहितीनुसार, २०१ ते ३०० दरम्यानचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा धोकादायक तसेच ३०१ ते ४०० दरम्यानचा एक्यूआय अतिधोकादायक प्रकारात मोडला जातो.

 दिल्लीलाही मागे टाकले

मुंबईची एक्यूआय पातळी वाढत चालली असून, चालू आठवड्यात मुंबई दिल्लीपेक्षा वरची पातळी प्रदूषणात गाठली. मुंबापुरीतील पीएम टेन पातळीतही वाढ झाली आहे. सोमवारी मुंबईची एकूण एक्यूआय पातळी १९१ वर पोहोचली. जिथे दिल्लीची हीच पातळी ८४ चर होती. बांधकामाच्या धुळीमुळेच ही पातळी वाढते आणि लोकांना श्वास घेणेही कठीण करून टाकते. याबाबतही आर्थिक राजधानीने दिल्लीला मागे टाकले आहे. मुंबईत सुरू असलेले मोठ-मोठे प्रकल्प तसेच गगनचुंबी इमारतीचे बांधकाम हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. हवा प्रदूषण वाढीला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने सात महिन्यांपूर्वी नियमावली तयार केली. मात्र, अद्याप कोणावरही उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झालेली नाही.

सर्वात प्रदूषित

४२८ अंधेरी, पूर्व
२७६ माझगाव
२१२ मालाड

हवेची गुणवत्ता

शुक्रवार : १५९ आरोग्यास घातक
शनिवार : १४१ काही सेन्सिटिव्ह घटकांसाठी घातक
रविवार : १२९ सेन्सिटिव्ह घटकांसाठी घातक

हेही वाचा 

Back to top button