मुंबई/पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्कर ललित पाटील धडधाकट असतानाही तो गेले नऊ महिने पुण्यातील ससून रुग्णालयात कसा काय दाखल होता, त्याला तेथे दाखल करून ठेवण्यास कोणी मदत केली याची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती गुरुवारी सूत्रांकडून मिळाली. गेले नऊ महिने तो रुग्णालयात असताना त्याला नेमका कोणता आजार आहे याचे साधे निदान होऊ शकले नाही. ललित पाटील रुग्णालयात दाखल असताना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिस तैनात होते.
मात्र पोलिस बंदोबस्त असतानाही ललित पाटील रुग्णालयाच्या आत-बाहेर कसा येत-जात होता याचीही चौकशी करण्यात येत आहे. ललित पाटील याच्या मैत्रिणीही तेथे येत होत्या हे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चौकशीत दोषी आढळणार्या ससून रुग्णालयातील अधिकारी- कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय गृह विभागाकडून दोषी पोलिसांवर कारवाई अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा